11 April 15:34

...म्हणून शेतकरी आत्महत्या वाढल्या; शरद पवारांचा सरकारवर घणाघात


...म्हणून शेतकरी आत्महत्या वाढल्या; शरद पवारांचा सरकारवर घणाघात

कृषिकिंग, नाशिक: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतक-यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यावर सत्ताधारी भाजप सरकारवर तीव्र शब्दात निशाणा साधलाय. सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अजिबात आस्था नाही. कांदा महागला तर २ पैसे शेतकऱ्यांना मिळतात. मात्र, मागच्या सरकारमध्ये कांदा महागला म्हणून भाजपनं आंदोलन केलं होतं. शेतकऱ्यांना पैसा मिळू नये ही या सरकारची मानसिकता आहे. म्हणून शेतकरी आत्महत्या वाढल्या, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

नाशिक जिल्ह्यातील सय्यद पिंप्री येथील आघाडीची प्रचारसभेला शरद पवार यांनी संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीच्या प्रमुख नेते उपस्थित होते. शेतकऱ्यांची सामूहिक शक्ती या निवडणुकीत चमत्कार करु शकते, असा विश्वासही पवारांनी यावेळी व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांना पैसा मिळू नये ही या सरकारची मानसिकता आहे. म्हणून कांद्याचे दर पडलेत. उत्पादनाच्या दरात संतुलन राखण्यात सरकार अपयशी ठरलंय. उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना घामाची किंमत मिळायला हवी. गहू आणि तांदूळसह सर्व शेतीमाल उत्पादनात मोदी सरकारनं आघाडी सरकारच्या तुलनेत अत्यल्प वाढ केली. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढ केल्याचा मोदी सरकारचा दावा खोटा आहे. असेही पवार यावेळी म्हणाले आहे.