23 July 18:02

...तर मुख्यमंत्र्यांकडे दूध दरात ३ रुपये कपात करण्याची मागणी करणार- खोत


...तर मुख्यमंत्र्यांकडे दूध दरात ३ रुपये कपात करण्याची मागणी करणार- खोत

कृषिकिंग, सांगली: "शेतकऱ्यांच्या दुधाला जर तुम्ही २८ रुपये प्रति लिटर दर दिला नाही तर स्पष्ट होईल, की तुम्ही सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारत आहे. त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांकडे दूध दरात ३ रुपये कपात करण्याची मागणी करणार आहे." असा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दूधसंघांना दिला आहे. सरकारने दुधाला दिलेल्या ५ रुपये दरवाढीच्या निमित्ताने पांढऱ्या दुधातील हे काळे बोके आहे, हे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समजेल. असा टोलाही खोत यांनी यावेळी लगावला आहे. सांगली येथील आयोजित पत्रकार परिषदेत सदाभाऊ यांनी दूध संघांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे.

आम्ही तोटा सहन करून दूधाला प्रति लिटर २३ रुपये दर देत होतो, असा कांगावा आता हे दूध संघवाले करतील. पण सरकारकडे ५ रुपये दरवाढ ही तुमचा तोटा भरून काढण्यासाठी मागितली की शेतकऱ्यांसाठी मागितली? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी यावेळी उपस्थित केला आहे. जर दूध संघांनी त्यांच्या तोटा भरून काढण्यासाठी वाढीव दर न मागता, शेतकऱ्यांसाठी वाढीव दराची मागणी केली असेल तर मग दुधाला २८ रुपये प्रति लिटर दर द्यावा लागेल. मात्र, तुमचा तोटा भरून काढण्यासाठी हा दर मागितला असेल तर मग तुम्ही शेतकऱ्यांना प्रति लिटर २५ रुपये देत आहात, हे सिद्ध होईल. असेही खोत यावेळी म्हणाले आहे.