21 July 18:16

‘राम-राम स्वाभिमानी’- सदाभाऊ खोत


‘राम-राम स्वाभिमानी’- सदाभाऊ खोत

कृषिकिंग, पुणे: स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडली आहे. राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकला आहे. पुण्यामध्ये चौकशी समितीशी चर्चा करण्यासाठी हजेरी लावत त्यांनी आपण पक्षाला सोडचिट्टी दिल्याचे जाहीर केले.

यावेळी त्यांनी आपल्या भावनेला वाट मोकळी करुन दिली. ते म्हणाले, ‘आजपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पूर्णविराम.’ ऑगस्ट महिन्यापासून राज्यभर दौरा करू आणि त्यानंतर कार्यकर्त्यांचे शिबीर घेऊ. स्वतंत्र संघटना उभारावी ही कार्यकर्त्यांची मागणी आहे. तुम्ही कार्यकर्तेच मायबाप आहात. तुमच्यामुळेच खुर्चीत बसलोय. मी संघटनेच्या विरोधात कुठलंही काम केलेलं नाही. अशी भूमिका सदाभाऊंनी यावेळी मांडली.

गेल्या काही दिवसांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरु होते. भाजपाने सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद दिल्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. सत्तेत सहभागी होताच खोत संघटनेचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न विसरले, असा आरोपही शेट्टी यांनी केला होता.

परिणामी, शेट्टी-खोत वाद इतका विकोपाला गेला की, वडिलांच्या आजारपणासाठी दिलेल्या उसन्या पैशाचे हिशेबही त्यांनी जाहीरपणे चुकते केले. त्यानंतर गेल्या महिन्यात राजू शेट्टी यांनी पुणे ते मुंबई अशी पायी आत्मक्लेश यात्रा काढली होती. त्यात खोत सहभागी झाले नव्हते. त्यावेळी खोत यांच्याबाबतचा निर्णय लवकरच घेऊ असे सूचक विधान शेट्टींनी केले होते. सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राजीनामा दिला आहे. यानंतर ते आपली स्वतंत्र पक्ष काढतात की भाजपामध्ये प्रवेश करतात हे पाहणं महत्वाचे राहणार आहे.टॅग्स