12 June 09:54

‘निकष, तत्त्वत: आणि सरसकट’ या शब्दांची काळजी- पवार


‘निकष, तत्त्वत: आणि सरसकट’ या शब्दांची काळजी- पवार

कृषिकिंग, पुणे: तत्त्वत:, निकष आणि सरसकट या तीन शब्दांबाबत साशंकता व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचे रविवारी औरंगाबादेत सावधपणे स्वागत केले. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ‘या कर्जमाफीसाठी ३० हजार ५०० कोटी रुपये देण्यात सरकारला अडचण येणार नाही,’ असेही ते म्हणाले.

‘सरसकट’ या शब्दावर जोर देत पवार म्हणाले की, ‘शेतकरी दोन प्रकारची कर्जे घेतो. दीर्घ आणि अल्प मुदतीची ती कर्जे असतात. विहिरीपासून नांगर, ट्रॅक्टरसारख्या उपकरणांसाठी दीर्घ मुदतीची कर्जे घेतो, तर पीक कर्ज हे अल्प मुदतीचे कर्ज असते. दीर्घ व अल्प कर्जाची ही शासकीय व्याख्या असून ही सारी कर्जे माफ करण्याचा निर्णय स्वागतार्ह असला तरी तत्त्वत: आणि निकष याबाबत शंका घेण्याची वेळ सरकारने आणू नये,’ असा टोलाही
त्यांनी लगावला. कर्जमाफीची घोषणा करणारे चंद्रकांत पाटील महसूलमंत्री असून त्यांनी शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याच्या कामाला तलाठी व सर्कल आदी घटकांना तात्काळ कामाला लावावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी अंमलात आणण्याबाबत केंद्राशी चर्चा करण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना पवार म्हणाले की, 'शेतीमालाच्या किमती ठरवताना उत्पादन खर्च अधिक ५० टक्के लाभ ही शिफारस अंमलात आणण्याची मागणी प्रामुख्याने करणे गरजेचे आहे'.