09 March 17:31

‘जिओ-टॅगिंग’ प्रणालीद्वारे पुणे विभागात जलयुक्त शिवारची ५५ टक्के कामे


‘जिओ-टॅगिंग’ प्रणालीद्वारे पुणे विभागात जलयुक्त शिवारची ५५ टक्के कामे

कृषिकिंग, पुणे: जलयुक्त शिवार’ योजनेंतर्गत २०१६-१७ या वर्षात ‘जिओ-टॅगिंग’ प्रणालीद्वारे पुणे विभागात आतापर्यंत ५५ टक्के कामे झाली आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात ९० टक्के तर त्या खालोखाल कोल्हापूरमध्ये ७३ टक्के काम झाले आहे. कामाच्या पारदर्शकतेसाठी शासनाने ही प्रणाली तयार केली आहे.

‘जलयुक्त शिवार’ योजनेतील कामे पारदर्शकपणे होण्यासाठी शासनाने ‘जिओ टॅगिंग’ ही प्रणाली तयार केली आहे. या योजनेतील कोणतेही काम सुरु करण्यापूर्वी त्या कामाचा फोटो काढणे, त्यानंतर ते सुरु असताना फोटो काढणे, त्यानंतर ते काम पूर्ण झाल्यावर त्याचा फोटो काढणे व हे सर्व फोटो वेळोवेळी संबंधित वेबसाईटवर अपलोड करणे अशा पध्दतीने या प्रणालीचे काम आहे. यामुळे कामे कोणत्या पातळीवर असून त्याची सद्यस्थितीही समजते.

या प्रणालीच्या माध्यमातून पुणे विभागात २०१६-१७ या वर्षात करावयाच्या एकूण ४५,२४४ इतक्या कामांपैकी २४, ८२६ इतकी कामे आतापर्यंत झाली आहेत. हे प्रमाण ५५ टक्के इतके आहेत. विभागात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ९० टक्के कामे झाली असून, त्याखालोखाल अनुक्रमे कोल्हापूर जिल्ह्यात ७३ टक्के, सांगली जिल्ह्यात ७१ टक्के, सातारा जिल्ह्यात ७० टक्के, सोलापूर जिल्ह्यात ४२ टक्के इतकी कामे झाली आहेत.

‘जलयुक्त’मधील अनघड दगडी बांध, लहान मातीचे बांध, मातीचा नाला बांध, नाला गाळ काढणे, नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांध, कोल्हापुरी बंधारा, शेततळे, बांधावरील वृक्षलागवड, शेततळे, वनतळे, समतल चर, शेताची बांधबंदिस्ती, विहीर पुनर्भरण, गावतलाव दुरुस्ती, गाळ काढणे, ठिबक सिंचन, कालवा दुरुस्ती, पाझर तलाव, आदी स्वरूपाची कामे या प्रणालीद्वारे केली जात आहेत.