05 January 11:36

‘जलयुक्त शिवार’मुळे दोन वर्षात राज्य दुष्काळमुक्त होणार- मुख्यमंत्री


‘जलयुक्त शिवार’मुळे दोन वर्षात राज्य दुष्काळमुक्त होणार- मुख्यमंत्री

कृषिकिंग, मुंबई: गेल्या तीन वर्षात राज्यातील शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांनी तसेच सरकारी यंत्रणांनी टीम म्हणून केलेल्या कामामुळेच राज्यातील ११ हजार गावे जलपरिपूर्ण झाली असून, यावर्षी आणखी पाच हजार गावे दुष्काळमुक्त होणार आहेत. जलयुक्तमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन झाले असून या गतीने पुढील दोन वर्षे कामे केली तर राज्य दुष्काळमुक्त होऊन शेतकरी सुखी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत सन २०१५-१६ या वर्षात जलयुक्त शिवार योजनेत उत्कृष्ट कार्य केलेली गावे, तालुके, जिल्हे तसेच व्यक्ति, संस्था, अधिकारी व पत्रकारांना राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

“जलयुक्त योजना आणखी पुढे न्यायची आहे. आतापर्यंत झालेली कामे निरंतर रहावीत, यासाठी नियोजन केले आहे. येत्या दीड वर्षात संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी अधिक जोमाने कामे करावी लागणार आहेत. या कामासाठी लोकसहभागाबरोबरच अभिनेता आमीर खानचे पाणी फाऊंडेशन, अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांचे नाम फाऊंडेशन, दिलासा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थांबरोबरच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, डॉ. अविनाश पोळ,पोपटराव पवार यांनी या योजनेत मोठे योगदान दिले आहे. तसेच टाटा ट्रस्ट, बजाज फाऊंडेशन याबरोबर अनेक कार्पोरेट कंपन्यांनीही सहकार्य केले आहे,” असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.