16 March 10:29

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेतून दुष्काळी जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करावे- मुख्यमंत्री


‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेतून दुष्काळी जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करावे- मुख्यमंत्री

कृषिकिंग, मुंबई: “‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही राज्य सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी आणि मोठे परिवर्तन करणारी योजना असून यामुळे धरणे, तलाव, तळी पुनरुज्जीवित होऊन शेत जमीन सुपीक होत आहे. यावर्षी या योजनेंतर्गत पुढील तीन ते चार महिने दुष्काळी जिल्ह्यातील कामांवर लक्ष केंद्रीत करावे, जेणेकरून पावसाळ्यात या जिल्ह्यातील पाणीसाठ्यात वाढ होवून शेत जमिनींनाही मोठा फायदा होईल,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

मृद व जलसंधारण विभागाच्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वयंसेवी संस्था, विविध कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व विभागाचे प्रतिनिधी यांच्याबरोबर संवाद साधून या योजनेसंबंधी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते.

राज्यात जलयुक्त शिवार अभियान यशस्वीपणे राबविल्यानंतर जुनी धरणे, तलावांमधील गाळ काढून ती पुनरुज्जीवीत करण्याच्या हेतूने हे अभियान राबविण्यात येत आहे. यातून पाणीसाठा वाढण्याबरोबरच शेत जमिनीची सुपिकताही वाढण्यास मदत होईल. गेल्यावर्षी या योजनेस मोठा प्रतिसाद मिळाला असून, पुढील दोन ते तीन वर्षात राज्यातील ७० ते ८० टक्के धरणे ही गाळमुक्त होणार आहेत. या माध्यमातून चांगले काम चालले असून, राज्य शासन या मागे खंबीरपणे उभे आहे. राज्य शासन, स्वयंसेवी संस्था,लोकसहभाग व विविध कंपन्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या या मोहिमेला उत्सवाचे रूप देऊ या. या योजनेची कामे करताना त्याला तंत्रज्ञानाची जोड द्यावी. झालेल्या प्रत्येक कामांचे बिग डाटा अॅनालिटिक्स प्रणालीप्रमाणे, डॉक्युमेंटेशन व मॅपिंग करावे. या कामासाठी संसाधनांचा आणि सामग्रीचाही प्रभावी वापर करण्यात यावा. यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. तसेच लोकसहभागासह विविध घटकांना जोडून घेण्यात येईल, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे.