05 December 10:21

‘ओखी’ वादळाची वाटचाल महाराष्ट्र-गुजरात किनारपट्टीच्या दिशेने


‘ओखी’ वादळाची वाटचाल महाराष्ट्र-गुजरात किनारपट्टीच्या दिशेने

कृषिकिंग, मुंबई: “तामिळनाडू, केरळमध्ये विध्वंस करून आता अरबी समुद्रात आलेले ‘ओखी’ चक्रीवादळ मुंबईपर्यंत धडकले असून, याची वाटचाल गुजरात-सुरतच्या दिशेने सुरू झाली आहे. दरम्यान, या वादळाचा प्रभाव म्हणून राज्याच्या उत्तर भागाला फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पाऊस होईल,” असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सांगितले आहे.

ओखी वादळाच्या प्रभावामुळे उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी व गुजरातच्या सीमेलगतच्या जिल्ह्यांत आज आणि उद्या (५ व ६ डिसेंबर) पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. दरम्यान यामुळे द्राक्ष, केळी, आंबा पिकांना त्याचा मोठा फटका बसू शकतो. असे असतानाच देशाच्या उत्तरेकडून जोरदार थंड वारे राज्यात धडकण्याची शक्यता असून त्यामुळे पारा घसरण्याची शक्यता आहे.