25 December 10:31

७३८ कोटींच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेचा शुभारंभ


७३८ कोटींच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेचा शुभारंभ

कृषिकिंग, यवतमाळ: “जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सर्वाधिक झाल्या आहेत. त्याचे कारण शोधले, तर सिंचनाचा अभाव हे दिसून येते. शेतीला पाणी मिळाल्यास उत्पन्नात अडीच पटीने वाढ होईल. शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी पैसे दिले आहेत. यापुढेही देणार, आता खासदार व आमदारांनी लक्ष देऊन ही कामे एका वर्षात करून घेतली पाहिजेत. यातून शेतकऱ्यांना जीवदान मिळणार आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

बाभूळगाव तालुक्‍यातील घारफळ येथे ७३८ कोटींच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेचा प्रारंभ झाला, त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री मदन येरावार, खासदार भावना गवळी, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी उपस्थित होते.

“स्मार्ट शहरे व्हायला होत आहेत. आता स्मार्ट व्हिलेज व्हावे, यासाठी नव्या संकल्पनांना प्राधान्य दिले आहे. शेतीपूरक व्यवसायाला महत्त्व देण्यासाठी शेतकऱ्यांच्या तुराट्या व पऱ्हाट्यापासून सीएनजी ऊर्जा तयार करण्याचे काम केंद्र शासनाने हाती घेतले आहे. दळणवळणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. शेतकरी आत्महत्यांचे कारण शोधून त्यावर योग्य दिशेने काम करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी सीएनजी ऊर्जा तयार कराव्यात, यासाठीच्या योजना केंद्र शासनाने हाती घेतल्या आहेत. सीएनजीवर ट्रॅक्‍टर चालविले, तर इंधन स्वस्त स्वरूपाचे मिळेल. पारंपरिक शेती करण्यापेक्षा आधुनिक पद्धतीने शेती करून शेतीतील धोके दूर करावे,” असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले.

“पुढील काळात शेतकऱ्‍यांना शेततळेसुद्धा मोफत देण्याचे नियोजन आहे. ब्रिज कम बंधारा, रबर डॅम, चेक डॅम, नदी-नाले खोलीकरण आदी कामे करण्यात येत आहे. शेतकऱ्‍यांना क्रॉप पॅटर्न बदलविणे गरजेचे असून नवीन तंत्रज्ञान आत्मसाद केले पाहिजे, असे आवाहनही गडकरी यांनी केले आहे.