18 January 18:57

२४ तासात नाशिक जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या


२४ तासात नाशिक जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

कृषिकिंग, नाशिक: शेतात राब राब राबून जास्त उत्पादन घ्यायचं. जास्त उत्पादन घेऊनही सोन्यासारख्या शेतमालाला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. चांगली कसदार जमीन आणि भरपूर पाणी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतोय. गेल्या २४ तासात नाशिक जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.

कांद्याला भाव मिळत नसल्याने निराश होऊन मालेगाव तालुक्यातील कंधाने येथील शेतकरी ज्ञानेश्वर शिवणकर या शेतकऱ्याने शुक्रवारी सकाळी आत्महत्या केली. कांद्यासाठी जेवढा उत्पादन खर्च आला तेवढा खर्चही न वसूल झाल्याने शेतकऱ्याने आत्महत्येचा मार्ग पत्करला. ज्ञानेश्वर सारखीच व्यथा अनेक शेतकऱ्यांची असून अनेक शेतकऱ्यांना आपला कांदा फेकून द्यावा लागला आहे.

नांदगाव येथील चेतन बछाव या शेतकऱ्याने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. चेतन यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. त्यांचा उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला. त्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे.

सायने येथील शेतकरी वसंत सोनवणे यांनीही शुक्रवारी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सोनवणे यांच्यावर बँकेचे दीड लाख रुपयांचे कर्ज होते. त्यामुळे ते तणावात होते त्यातूनच त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला.

एकाच दिवशी ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनांमुळे मालेगाव तालुका आणि नाशिक जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या तीनही ठिकाणी तहसीदार ज्योती देवरे यांनी भेट देऊन पीडीत कुटुंबीयांची विचारपूस केली. याचा आहवाल त्या सरकारला देणार असून कुटुंबीयांना मदत मिळवून देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.