09 August 13:03

२२ ऑगस्टपर्यंत मॉन्सूनचा ब्रेक; बळीराजाच्या आशा आता परतीच्या पावसावर


२२ ऑगस्टपर्यंत मॉन्सूनचा ब्रेक; बळीराजाच्या आशा आता परतीच्या पावसावर

कृषिकिंग, पुणे: राज्यभरात जूनमध्ये चांगली सुरुवात केल्यानंतर जुलै महिन्यापासून नैऋत्य मान्सूनचे गणित बिघडले आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्याच्या बहुतांश भागात पावसाने खंड दिला आहे. हा खंड आता २२ ऑगस्टपर्यंत लांबण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.

मागील वर्षीही जुलै-ऑगस्टमध्ये मान्सूनने जवळपास ५५ दिवसांचा ब्रेक घेतला होता. याचीच पुनरावृत्ती यावर्षी होण्याची दाट शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला या ब्रेकचा सर्वाधिक फटका बसणार आहे. आता सर्व आशा परतीच्या पावसावरच असून आतापर्यंत सप्टेंबरमधील पावसानेच या भागाला तारले आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अहवालानुसार, १५ ऑगस्टपर्यंत नैऋत्य मान्सून देशाच्या उत्तर भागात जास्त सक्रिय राहील. मान्सूनचा ट्रफ उत्तरेकडे असल्याने कमी दाबाचे क्षेत्र उत्तर भारतात जास्त प्रमाणात निर्माण होईल. त्यामुळे या काळात उत्तरेकडील राज्यांत चांगला पाऊस होईल. तर याउलट दक्षिण आणि मध्य भारतात मान्सून सक्रियतेसाठी अनुकूल स्थिती नसल्याने पावसात खंड पडला आहे.

राज्यात मागील वर्षी जुलै -ऑगस्टमध्ये जवळपास ५५ दिवसांचा खंड पडला होता. त्यानंतर ऑगस्टच्या शेवटचा आठवडा आणि सप्टेंबरमधील पावसाने तूट काही प्रमाणात भरून काढली होती. यावर्षीही ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सप्टेंबरमधील पाऊस तारणार ठरू शकतो, असेही हवामान तज्ञांकडून सांगितले जात आहे.टॅग्स