06 July 11:15

२००९ नंतरच्या थकीत कर्जदारांचाही कर्जमाफी योजनेत समावेश


२००९ नंतरच्या थकीत कर्जदारांचाही कर्जमाफी योजनेत समावेश

कृषिकिंग,मुंबई: कर्जमाफीच्या ऐतिहासिक योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. २००९ नंतरच्या कर्जमाफीनंतरच्या कालावधीत कर्ज घेतलेल्या पण ३० जून २०१६ पर्यंत थकीत राहिलेल्या शेतकऱ्यांचाही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत समावेश करण्यात आला आहे.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठीची मुदतही एक महिन्याने वाढवण्यात आली आहे. ही मुदत आता ३१ जुलै २०१७ पर्यंत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत १एप्रिल २०१२ नंतर पीक कर्ज किंवा मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या आणि ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र १ एप्रिल २०१२पूर्वी कर्ज घेतलेले अनेक थकीत शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत होते. त्यामुळे १ एप्रिल २०१२ हा निकष काढून त्यात २००९ नंतरच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

२०१६-१७ या वर्षात पीक कर्ज घेतलेल्या आणि या कर्जाची ३० जून २०१७ पर्यंत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेंतर्गत परतफेड केलेल्या कर्जाच्या २५ टक्के अथवा कमाल २५ हजार आणि किमान १५ हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.