01 April 11:05

१९ व्या वर्षी शेतीतून सोनं पिकवणारी कृषिकन्या; करते लाखोंची उलाढाल


१९ व्या वर्षी शेतीतून सोनं पिकवणारी कृषिकन्या; करते लाखोंची उलाढाल

कृषिकिंग, जालना: पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये महिला चांगलं काम करत असतील. शेतीमध्ये तर अनादी काळापासून कामांचा गाडा ओढण्याचं काम महिला वर्ग करत आहे. आजही शेतीत काम करणाऱ्या महिलांचं प्रमाण सर्वाधिक आहे, मात्र वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी शिक्षण सोडून मुलीनं शेतीची जबाबदारी खांद्यावर घेणं आणि शेतीतून लाखो रुपये कमावणं याचा तुम्ही विचार करु शकता का? तुम्ही काहीही विचार करा मात्र हे खरं आहे.

जालना जिल्ह्यातील कडवंची गावात नारायण क्षीरसागर नावाचे शेतकरी आहे. नारायणरावांचा ५ वर्षांपूर्वी अपघात झाला आणि ते अंथरुणाला खिळले. त्यांना ६ एकर शेती आहे. मात्र, आता अपघातामुळे ही शेती कसणार कोण? असा सवाल नारायणरावांना पडला. कारण नारायणरावांना एकूण ७ मुली, पैकी ६ मुलींची लग्न झालेली. घरात उरली एकुलती एक मुलगी तीही अवघ्या १३ वर्षांची. मुलगा नसल्याचं दुःख नारायणरावांना ठसठशीतपणे जाणवलं. मात्र त्यांच्या याच दुःखावर फुंकर घालण्याचं काम त्यांच्या त्या लहानग्या लेकीनं केलं.

उमा क्षीरसागर सध्या तिचे वय 19 वर्षे आहे. एक दोन नव्हे तर तब्बल ६ एकर शेती उमा एकटी कसत आहे. आपल्या लेकीबद्दल नारायणराव कौतुकानं बोलतात, “दोन-तीन वर्षांपासून शेतीचं सगळं काम उमा करते. पुरुषासारखं काम करते. पिकाला पाणी देणं, ड्रीप वगैरे करणं सगळंकाही ती करते. मला मुलाची गरज नाही, अशी मुलगी काम करुन राहिली”, असं नारायणराव म्हणतात.

उमालाही आपल्या कर्तव्याची चांगलीच जाणिव आहे. तिच्या बोलण्यातून ते स्पष्टपणे जाणवतं. “13 वर्षांची होते तेव्हा माझ्या वडिलांचा अपघात झाला. माझ्या ६ बहिणींची लग्नं झाली होती. अपघातामुळे वडिलांकडे लक्ष द्यायला कुणी नव्हतं. वडील उदास रहायचे. तेव्हा मी सातवीत होते, मात्र शाळा सोडून मुलासारखी मी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिले. पहिल्या वर्षी मला द्राक्षबागांबद्दल फारशी माहिती नव्हती, त्यामुळे फक्त ५० हजारांचे उत्पन्न काढले. हळूहळू माहिती वाढली तसं द्राक्षशेती वाढवली. आज अडीच एक द्राक्षशेतीमधून मी तीन-साडेतीन लाखाचं उत्पन्न काढते, असं उमा अभिमानाने सांगते.

जालना जिल्हा म्हटलं तर पाणी समस्या तीव्र, मात्र उमानं त्यावरही मात केलीय. आपल्या सहा एकर शेतीसाठी तीनं शेततळं बांधलंय. उमाच्या आईलाही आपल्या या लेकीचा सार्थ अभिमान आहे. वय झालंय त्यामुळे आता उमाला स्थळं येऊ लागली आहेत. त्यावर तिची आई सांगते, “उमा सगळी कामं करते. स्वयंपाक करते, झाडलोट करते, दुधं काढते. रात्री बाराला लाईट आली की मोटर चालू करुन पिकांना पाणी देते. तुमचा मुलगा काय करीन ते सगळं आमची मुलगीच करते.”

एकूण ६ एकर असलेल्या शेतीपैकी उमाने सध्या दोन एकरात द्राक्ष, दीड एकरात ज्वारी, दीड एकरात कापूस, अर्धा एकरात गहू तर उरलेल्या अर्धात एकरात हरभरा लावलाय. २ एकरापैकी ३५ गुंठ्यातील द्राक्षांची काढणी झालीय. यातून तिला ८० क्विंटल उत्पादन मिळालंय. तिच्या द्राक्षांना ३६ रुपये प्रति किलोचा दर मिळालाय. या ३५ गुंठ्यांमधून तिला तब्बल 3 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय...आपल्या जन्मदात्याला मुलाची कमी जाणवू न देणाऱ्या या कृषीकन्येला सलाम...तिची ही यशोगाथा आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे.