07 May 10:15

१५ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता- आयएमडी


१५ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता- आयएमडी

कृषिकिंग, नवी दिल्ली: देशातील तेरा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये येत्या २४ तासात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. देशातील अनेक भागांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय काही भागांमध्ये गारपीटदेखील होऊ शकते, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.

हवामान विभागाने जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांना अलर्ट जारी केला आहे. जम्मू-कश्मीर आणि हिमाचल प्रदेशात वादळी वाऱ्यासह गारपिटीचीही शक्यता आहे. तर पंजाब, हरियाणात पुढील ४८ ते ७२ तासात पुन्हा वादळी पावसाचा अंदाज आहे. पंजाबमध्ये हलका पाऊस आणि वादळ येऊ शकते. तिकडे राजस्थानमध्ये धुळीचे वादळ येण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने हरियाणा सरकारने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे हरियाणातील ३५० खासगी शाळा आणि ५७५ सरकारी शाळा दोन दिवस बंद राहतील. असे हरियाणाचे शिक्षणमंत्री प्रा. रामविलास शर्मा यांनी जाहीर केले आहे. तर गेल्या आठवड्यात उत्तर भारतीय पाच राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. यामध्ये १२४ जणांचा मृत्यू तर जखमींचा आकडा ३०० पर्यंत पोहचला आहे.टॅग्स