02 February 17:10

११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान इस्लामपूर येथे जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन- खोत


११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान इस्लामपूर येथे जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन-  खोत

कृषिकिंग, सांगली: कृषी क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देणे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रयोगशील आणि प्रगतीशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपआपसातील विचारांची देवाण-घेवाण करून देण्यासाठी, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे राज्य शासनाचा कृषी विभाग आणि ‘आत्मा’ विभागातर्फे ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आढावा बैठकीत दिली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तर महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर हेही यावेळी उपस्थित राहणार आहे.

या महोत्सवात कृषी व कृषीपूरक व्यवसाय आधारित ४०० स्टॉल उभारण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक तंत्रामुळे शेतीपूरक व्यवसाय व बाजारपेठ संशोधन, शेतीत वेगवेगळे प्रयोग कसे करावेत याविषयी मार्गदर्शन होणार आहे. तसेच शेतकरी, शास्त्रज्ञ, आणि संशोधन विस्तार शेतकरी व विपणन साखळी सक्षमीकरण, समूहगट स्थापन करून शेतकरी उत्पादन कंपन्यांची उभारणी करणे यांसारखी महत्वपूर्ण माहिती दिली जाणार आहे. यासोबतच कृषीविषयक परिसंवाद आणि व्याख्याने यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण, विक्रेता व खरेदीदार यांच्यात बाजारभिमुख कृषी उत्पादनास व व्यापारास चालना देणे. हा या महोत्सवाचा मुख्य हेतू आहे. अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.