14 January 14:55

हवामानाच्या अचूक अंदाजासाठी पुणे वेधशाळेत सुपर कंप्युटर स्थापित


हवामानाच्या अचूक अंदाजासाठी पुणे वेधशाळेत सुपर कंप्युटर स्थापित

कृषिकिंग, पुणे "पुणे येथील भारतीय हवामानशास्त्र संस्थेमध्ये प्रत्युष हा सर्वात वेगवान सुपर कंप्युटर कार्यान्वित करण्यात आला आहे. ज्यामुळे आता यापुढे हवामानाचा अधिक अचूक अंदाज घेता येणार आहे." असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री हर्ष वर्धन यांनी आयआयटीएमच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. हवामान अंदाजासाठीची 'एचपीसी' ही एक राष्ट्रीय स्तरावरील सुविधा असून, पीकक्षमता आणि कामगिरीच्या बाबतीत हे सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान आहे.

"मान्सूनचा अंदाज, त्सुनामी, चक्रीवादळे, भूकंप, वारा, वीज, मासेमारी, उष्ण आणि थंड लाटा, पूर आणि इतर दुष्काळाच्या बाबतचे अंदाज लावण्यात खूप मोठी मदत होणार आहे. ही सुविधा भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) आणि इतर हवामान परीक्षण संस्थांबरोबर समन्वय ठेवण्यासाठीही वापरली जाईल." अशी माहितीही आयआयटीएमने प्रसिद्ध केलेल्या अहवालात दिली आहे.

नॅशनल सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फ़ॉरकास्टिंग (एनसीएमआरडब्ल्यूएफ), नोएडा येथे स्थापित केलेले पहिले युनिट, दैनिक हवामान अंदाज पुरविण्यासाठी हवामान संस्थांना सहाय्य करते. या सुपर कॉम्प्युटरमुळे हवामान विश्लेषणासाठी आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होईल आणि नैसर्गिक आपत्तींचे सुधारित अंदाज आणि इशारे प्राप्त होतील.