23 March 10:24

हवामानाचा डाटा आता मोबाईलद्वारे होणार संकलित; आयएमटीचा प्रकल्प


हवामानाचा डाटा आता मोबाईलद्वारे होणार संकलित; आयएमटीचा प्रकल्प

कृषिकिंग, पुणे: भारतासारखा लहरी हवामान असलेल्या ठिकाणाच्या हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी अधिक अचूक डाटा अत्यावश्यक असतो़. हा डाटा कोणत्याही अडथळ्याशिवाय नियमितपणे उपलब्ध व्हावा, यासाठी हवामान विभाग आता त्यांच्या सर्व स्वयंचलित हवामान केंद्रातील माहितीचे संकलन जीपीआरएस बेस असलेल्या मोबाईलद्वारे करणार आहे़. त्यामुळे त्यातील मानवी हस्तक्षेप कमी होऊन अधिक विश्वसनीय माहितीचा साठा उपलब्ध होणार असून, हवामानाचा अधिक अचूक अंदाज व्यक्त करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे़.

हवामान विभागामार्फत देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक स्वयंचलित हवामान केंद्र तर देशभरात १३५० पर्जन्यमापन केंद्रे उभारण्यात आले आहेत़. या ठिकाणी वातावरणाची आर्द्रता, हवेचा वेग, जमीन तापमान अशी माहिती दर तीन तासांनी घेतली जाते़. सध्या ही माहिती सॅटेलाईट सेंटरद्वारे पुण्यात येते़. यातील मानवी हस्तक्षेप कमी व्हावा, त्यात सातत्य राहावे, यासाठी आता या सेंटरमध्ये मोबाईल चीप बसविण्यात येणार आहे़. त्याद्वारे दर तीन तासांनी संकलित झालेला डाटा हा थेट पुण्यातील हवामान केंद्रामधील संगणकावर उपलब्ध होणार आहे़. या प्रकल्पाची सुरुवात झाली असून, मार्च २०१९ पर्यंत तो पूर्ण होणार आहे़. हा डाटा उपलब्ध झाल्याने कृषी व सर्वसाधारण हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात अधिक अचूकता येणार असल्याची माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ मनीष रनाळकर यांनी दिली़ आहे.



टॅग्स