05 March 10:35

हवामान विभागाचे डोके ठिकाण्यावर आहे का? पुन्हा गारपीटीचा इशारा


हवामान विभागाचे डोके ठिकाण्यावर आहे का? पुन्हा गारपीटीचा इशारा

कृषिकिंग, मुंबई: उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भात बुधवारी अर्थात ७ मार्चला गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. दक्षिणपूर्व अरबी समुद्रात केरळ ते महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याच्या प्रभावामुळे येत्या बुधवारी म्हणजेच ७ मार्चला उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या गडगडाटासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

अरबी समुद्राकडून येणारे वारे आणि उत्तरेकडून येणाऱ्या या वाऱ्यांमुळे उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच पश्चिम मध्य प्रदेश, उत्तर मध्य प्रदेश या भागात बुधवारी मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. असे हवामान विभागाने म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान मराठवाडा, विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, आणि उत्तर प्रदेशाच्या काही परिसरात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली होती. यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना वेळदेखील मिळाला नाही. तोच दुसऱ्यांदा गारपिटीचा इशारा देऊन हवामान खात्याने शेतकऱ्यांना दुसरा धक्का दिला. २० फेब्रुवारीला हवामान खात्याने अंदाज जाहीर केला. या अंदाजात हवामान खात्याने २३ आणि २४ फेब्रुवारीला उत्तर-मध्य महाराष्ट्रात वादळासह गारपीट होईल, असा इशारा दिला. हवामानाचा अंदाज देताना थोडाफार अंदाज चुकू शकतो, पण २३ व २४ फेब्रुवारीला थोडा फार पाऊसही आला नाही.

हवामान खात्याच्या अंदाजात वारंवार होणारे बदल आता शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरत चालले आहेत. २० फेब्रुवारीला हवामान खात्याने वादळासह गारपिटीचा अंदाज दिला. या अंदाजावर विश्वास ठेवणाऱ्या शेतकऱ्यांनी गारपिटीच्या भीतीने त्यांची द्राक्षे, संत्री व इतर मालाची काढणी आहे त्या स्थितीत केली. मात्र, गारपीटच नव्हे तर पाऊस देखील होणार नाही असा नवा अंदाज हवामान विभागाने २४ फेब्रुवारीला संध्याकाळी जाहीर केला, परंतु, तत्पूर्वीच्या गारपिटीच्या अंदाजावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेऊन पिकांची काढणी केल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले. आणि आता पुन्हा एकदा हवामान खात्याने गारपीटीचा इशारा दिल्याने असेच म्हणावे लागेल की, ‘हवामान विभागाचे डोके ठिकाण्यावर आहे का?’टॅग्स