04 March 14:50

हवामान खात्याचा अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांचे नुकसान


हवामान खात्याचा अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

कृषिकिंग, पुणे: हवामान खात्याच्या अंदाजात वारंवार होणारे बदल आता शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरत चालले आहेत. २० फेब्रुवारीला हवामान खात्याने वादळासह गारपिटीचा अंदाज दिला. या अंदाजावर विश्वास ठेवणाऱ्या शेतकऱ्यांनी गारपिटीच्या भीतीने त्यांची द्राक्षे व संत्री आहे त्या स्थितीत तोडली. मात्र, गारपीटच नव्हे तर पाऊस देखील होणार नाही असा नवा अंदाज त्यांनी जाहीर केला, परंतु, तत्पूर्वीच्या गारपिटीच्या अंदाजावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्याच पंधरवडय़ात वादळी पावसासह झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना वेळदेखील मिळाला नाही. आणि त्यातच दुसऱ्यांदा गारपिटीचा इशारा देऊन हवामान खात्याने त्यांना दुसरा धक्का दिला. २० फेब्रुवारीला हवामान खात्याने अंदाज जाहीर केला. या अंदाजात हवामान खात्याने २३ फेब्रुवारीला उत्तर-मध्य महाराष्ट्रात वादळासह गारपीट होईल, असा इशारा दिला. तसेच २१ फेब्रुवारीला हवामान खात्याकडून पुन्हा एक अंदाज जाहीर करण्यात आला. यात हवामान खात्याने २३ फेब्रुवारीला उत्तर-मध्य महाराष्ट्रात तर वादळासह गारपीट होईल तर २४ व २५ फेब्रुवारीला विदर्भ, मराठवाडा देखील गारपिटीच्या तडाख्यात येईल, असे सांगण्यात आले.

२२ फेब्रुवारीला त्यांनी पुन्हा एक अंदाज जाहीर केला. यावेळी त्यांच्या हवामान अंदाजात काहीच बदल नव्हता, उलट २६ फेब्रुवारीलासुद्धा गारपीट होईल असे सांगण्यात आले. त्याच दिवशी सायंकाळी पुन्हा एक हवामान अंदाज त्यांनी जाहीर केला. यात त्यांनी २३ फेब्रुवारीला कुठेही वादळी गारपीट होणार नाही, पण २४ फेब्रुवारीला उत्तर-मध्य, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट होईल असे सांगितले. या अंदाजात त्यांनी २५ आणि २६ फेब्रुवारीचा हवामानाचा अंदाज गाळला. दरम्यान, २३ फेब्रुवारीला पुन्हा एक अंदाज दिला आणि यात त्यांनी महाराष्ट्रात कुठेही गारपीट होणार नाही, असे स्पष्ट केले.

हवामानाचा अंदाज देताना थोडाफार अंदाज चुकू शकतो, पण यावेळी त्यांनी २०, २१ आणि २२ फेब्रुवारीला सलग तीन दिवस अंदाज जाहीर केले आणि ते देखील या तीनही अंदाजात वैविध्य दाखवले. गारपीट आणि वादळाने शेतकरी तसाही घाबरतो. आठवडाभरापूर्वीच वादळी गारपिटीचा धक्का शेतकऱ्यांना बसला होता. गारपिटीचा सर्वाधिक फटका द्राक्षांना बसतो आणि त्यामुळेच दुसऱ्यांदा दिलेल्या गारपिटीच्या इशाऱ्याने शेतकरी घाबरले. विशेष म्हणजे हवामान खात्याने गारपीट होणार हा अंदाज दिला आणि यादरम्यान पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी नेट वापराव्यात असे आवाहन केले. हे आवाहन मनात आणले तरी एवढय़ा महागाच्या नेट आणायच्या कोठून? आणि मिळवल्या तरी त्या लावण्यासाठी मनुष्यबळ शेतकऱ्यांकडे आहे का? हे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले तरी त्यांची मजुरी देण्याइतपत शेतकऱ्यांकडे पैसे आहेत का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे हवामान खात्याकडे नाहीत.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजावर विश्वास ठेवून काही जिल्ह्य़ांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत हा इशारा पोहोचवला. त्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी आहे त्या स्थितीतील द्राक्ष आणि संत्री तोडण्यास सुरुवात केली. मात्र, हवामान खात्यासह त्यांचा कृषी सल्ला देखील बदलला. गारपीट होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, आधीच्या अंदाजावर विश्वास ठेवून तोडलेल्या द्राक्ष आणि संत्र्यांचे काय? पूर्णपणे तयार न झालेल्या या फळांना बाजारात भाव मिळणार का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

वातावरणात बदल होत असतात, पण हवामान खात्याने प्रत्येक दिवशी ज्या पद्धतीने अंदाज बदलवले, त्या पद्धतीने हे बदल होत नाहीत. त्यामुळे हवामानाचा अंदाज वर्तवताना किंवा इशारा देताना तो एकदाच कळवावा लागतो. हवामान खात्याच्या अंदाजानंतर राज्य सरकारने कृषी विभागाला कळवले. कृषी विभागाने स्थानिक अधिकाऱ्यांमार्फत ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. एकदा माहोल तयार झाला की लोक ऐकायला तयार नसतात आणि त्यांना हवामानाचे ताजे अंदाज कळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते.टॅग्स