08 June 14:23

हरियाणा सरकार देणार कांद्याच्या बियाण्यावर सबसिडी


हरियाणा सरकार देणार कांद्याच्या बियाण्यावर सबसिडी

कृषीकिंग, हरियाणा: हरियाणा सरकारने राज्यातील कांदा उत्पादनात वाढ होण्यासाठी कांद्याच्या बियांवर ५० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १२.५ किलो कांद्याचे बियाणे दिले जाईल. हे अनुदान पहिले या पहिले घ्या या तत्त्वानुसार दिले जाईल.

यासाठी शेतकऱ्याला बियाणे विकास निगम लिमीटेड. या बियाणे विक्री केंद्रावर जाऊन आपल्या हिस्याची रक्कम जमा करावी लागेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधारकार्ड व आपला पासपोर्ट फोटो सोबत ठेवणे गरजेचे आहे.

कृषिकिंग मार्केट रिसर्च:
श्री. प्रभाकर शिंदे (संचालक,पंचगंगा सीड्स) यांनी कृषिकिंग मार्केट रिसर्चला माहिती दिली की सबसिडी अंतर्गत कांदा बीज विकण्यातून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होतो. महाराष्ट्रात सिल्लोड, जालना येथील मार्केटमध्ये ५० ते १०० रु./ किलो ने निकृष्ट प्रतीचे कांदा बियाणे विकले जाते. बरेच व्यापारी येथून हे बियाणे विकत घेऊन सबसिडीमार्फत विकण्याचा प्रकार करतात. दर्जेदार बियाणे निर्मिती करताना कांदा हा दर्जेदार निवडावा लागतो, याचे उत्पादनदेखील कमी येते. त्यातुलनेत निकृष्ट कांदा १ ते २ रु. किलोने उपलब्ध होतो आणि यापासून बीजोत्पाद्न देखील जास्त होत असल्याने, अशा पद्धतीने बीजनिर्मिती आणि विक्रीचा प्रकार जोरात चालतो.

महाराष्ट्रापुरता विचार करता पंचगंगा सीड्स कांदा बीजाची ६० टक्के बाजारपेठ काबीज करते. त्याचवेळी महाबीज व इतर बीजोत्पादक यांचा बाजारपेठेतील हिस्सा ४० टक्के इतका आहे.