30 December 10:29

स्ट्रॉबेरीच्या मागणीत वाढ; उत्पादन ५० टक्क्यांनी घटले


स्ट्रॉबेरीच्या मागणीत वाढ; उत्पादन ५० टक्क्यांनी घटले

कृषिकिंग, नवी मुंबई: “वाई, पाचगणी, महाबळेश्वर, सातारा परिसरातील स्ट्रॉबेरीला गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. यामध्ये विंटर, चार्लीसारख्या प्रकाराला मोठ्या प्रमाणात मागणी असून, वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाला १५०० क्रेट स्ट्रॉबेरीची आवक होत आहे.” अशी माहिती वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी दिली आहे.

किरकोळ बाजारात स्ट्रॉबेरीच्या चांगल्या प्रतीच्या दोन किलोंच्या बॉक्ससाठी २०० ते २६० रुपये, तर दुय्यम प्रतीच्या स्ट्रॉबेरीसाठी १५० ते १८० रुपये दर मिळत आहे. थंडीचा हंगाम सुरू झाल्यापासून बाजारात स्ट्रॉबेरीची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. तर एपीएमसी घाऊक बाजारपेठेत ६००० ते ९००० रुपये प्रतिक्विंटल दराने स्ट्रॉबेरी उपलब्ध आहेत. चांगल्या प्रतीच्या स्ट्रॉबेरीचे दर हे दुय्यम प्रतीच्या स्टॉबेरीपेक्षा ४० ते ६० रुपयांनी जास्त आहेत.

मार्चपर्यंत स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू राहणार असून जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी स्ट्रॉबेरीचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटले आहे. यावेळी जानेवारी महिना सुरु होण्याच्या अगोदरपासूनच स्ट्रॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे उत्पादन घटल्याने मागणी असतानाही त्यानुसार उत्पादन न झाल्याने, गेल्या महिनाभरात आवक मोठ्या प्रमाणात घटली होती.