03 May 09:50

सौदी अरेबियाची एमार कंपनी राज्यात अन्नप्रक्रियेसाठी गुंतवणूक करणार- मुख्यमंत्री


सौदी अरेबियाची एमार कंपनी राज्यात अन्नप्रक्रियेसाठी गुंतवणूक करणार- मुख्यमंत्री

कृषिकिंग, नवी दिल्ली: अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सौदी अरेबियाची सरकारी कंपनी एमार (EMAAR) ही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक असून यासंदर्भात आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. कंपनीसोबत करार करण्याची प्रक्रियादेखील लवकरच होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे दिली आहे. प्रधानमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथे आज यासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीस मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, एमार उद्योग समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मध्य-पूर्वेतील देशांमधील अन्न प्रक्रिया क्षेत्रात काम करणारी एमार ही सौदी अरेबिया सरकारची एक आघाडीची कंपनी आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या मध्य-पूर्वेच्या दौऱ्यादरम्यान तेल सुरक्षेच्या बदल्यात अन्न सुरक्षा या सूत्रावर या कंपनीचे सहकार्य घेण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली होती. त्याअंतर्गत प्रधानमंत्र्यांच्या निमंत्रणानुसार आज ही बैठक पार पडली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांत गुंतवणूक करण्यास कंपनीने रुची दाखविली असून, या तिन्ही राज्यांत आवश्यक असणारी गुंतवणूक करण्याची कंपनीची क्षमता असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे.

फळे, भाज्या, अन्नधान्य आदींवर प्रक्रिया करून तयार केलेली उत्पादने मध्य-पूर्वेत पाठविण्याबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली. नाशिकसारख्या जिल्ह्यांना या प्रकल्पाचा प्रामुख्याने फायदा होऊ शकणार असून आंबा, द्राक्षे, कांदा, डाळिंब, भाज्या आदी उत्पादनांवर प्रक्रिया करण्यात येणार आहे. या भागात फूड पार्क उभारल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनांना शाश्वत भाव मिळण्यास त्याचा निश्चित फायदा होणार आहे. तसेच अन्न धान्याच्या नासाडीचे प्रमाणही अत्यंत कमी होणार आहे. असेही ते म्हणाले आहे.