21 January 08:47

सुधारित कृषि अवजार उत्पादक संघटनेची (आयमा) विशेष बैठक कृषिमहाविद्यालय पुणे येथे संपन्न


सुधारित कृषि अवजार उत्पादक संघटनेची (आयमा) विशेष बैठक कृषिमहाविद्यालय पुणे येथे संपन्न

कृषिकिंग, पुणे: सुधारित कृषि अवजार उत्पादक संघटना (आयमा) ची विशेष बैठक रविवारी (२० जाने.) कृषिमहाविद्यालय पुणे येथे संपन्न झाली. डॉ. व्ही. एम. मायंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत महाराष्ट्रातील सुधारित कृषि अवजारे उत्पादकांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली. बदलते सरकारी निकष, जीएसटीची धोरणे यामुळे नवनवीन तंत्रज्ञान आणि अवजारे शेतकऱ्यांपर्यंत पोहचवताना उत्पादकांना येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा झाली.

’आयमा’ राष्ट्रीय पातळीवर प्रश्न मांडणार
बैठकीत विविध प्रश्नांची चर्चा केली गेली असून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण उत्पादने, यंत्र अवजारे कमी कालावधीत उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने विशेष चर्चा करण्यात आली. जीएसटीचे कृषिअवजारांना मारक ठरणारे निकष तसेच काही कायदेशीर त्रुटींबाबत आयमा कडून राष्ट्रीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला जात असून त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे. महाराष्ट्रातील कृषिअवजार उत्पादकांचे प्रश्न या ‘आयमा’ च्या माध्यमातून पाठपुरावा करून सोडविण्यात येतील अशी ग्वाही संघटनेचे ‘पॅट्रन’ आणि पंजाबराव देशमुख कृषिविद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्ही. एम. मायंदे, यांनी दिली.

प्रा. डॉ. तुळशीदास बास्टेवाड (संचालक कृषितंत्रज्ञान विभाग, राहुरी) यांनी कृषिकिंगला दिलेल्या माहितीनुसार उत्पादकांकडून परीक्षणासाठी येणाऱ्या उत्पादनांचे अहवाल आणि नोंदणीकरण प्रक्रिया कमीत कमी कालावधीमध्ये पूर्ण व्हावी यासाठी देशभरात २५ हून अधिक केंद्र कार्यरत करण्यात आली आहेत, यापूर्वी ही संख्या केवळ चार इतकी होती.

आयमा (महाराष्ट्र) संघटनेच्या अध्यक्षपदी श्री. भरत पाटील यांची अध्यक्ष तसेच श्री, रणजीत पाटील यांची सचिव म्हणून बिनविरोध निवड झाली.

आयमा बाबत अधिक माहितीसाठी संपर्क: श्री. श्रीकांत ठुसे: 9766548304 , 9890290930