24 June 17:04

सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी


सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी

कृषिकिंग, मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांचं सरसकट दीड लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीवर ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. या कर्जमाफीला ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ असं नाव देण्यात आले आहे. तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 25 टक्के रक्कम (25 हजार रुपये कमाल मर्यादा) अनुदान म्हणून दिलं जाणार आहे. जूनपर्यंत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

राज्य सरकारने एकूण 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली आहे. या कर्जमाफीचा 89 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शिवाय, कर्जमाफीमुळे 90 टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल आणि उर्वरित 6 टक्के शेतकऱ्यांच्या कर्जाच्या परतफेडीत दीड लाख रुपये राज्य सरकारचा वाटा असेल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच आजी-माजी मंत्री, क्लास वन अधिकारी, करदाते, व्यापारी, व्हॅट पात्र यांना कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. तर भाजपचे मंत्री आणि आमदार कर्जमाफीसाठी एक महिन्याचा पगार देणार आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

कर्जमाफीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. शेतकऱ्यांनी ऐतिहासिक संपही पुकारला होता. त्यानंतर सुकाणू समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार दरबारी पोहोचवल्या गेल्या होत्या. शेतकऱ्यांच्या संपानंतर सरकारच्या हालचालीही वेगवान होऊन, राज्य सरकारकडून मंत्रिगटाची उच्चाधिकार समिती तयार करण्यात आली होती. तसेच सरकारकडून सुकाणू समितीशी चर्चा, विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांशी चर्चा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री शरद पवार, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याशी कर्जमाफीच्या मुद्यावर चर्चा झाली. आणि त्यानंतर आज अखेर कर्जमाफीची घोषणा झाली. त्यामुळे कर्जमाफीची घोषणा ही शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं यश म्हणावं लागेल.