08 January 11:07

समृद्धी महामार्गाच्या कामाचा लवकरच सुरुवात- मुख्यमंत्री


समृद्धी महामार्गाच्या कामाचा लवकरच सुरुवात- मुख्यमंत्री

कृषिकिंग, मुंबई: नागपूर-मुंबई द्रूतगती समृद्धी महामार्गासाठीच्या पर्यावरण आणि वन विभागाच्या सर्व परवानग्या मिळाल्या असून लवकरच कामाचा प्रारंभ करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे विविध बँकेच्या व्यवस्थापक-प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार हेही उपस्थित हेाते.

नागपूर-मुंबई द्रूतगती समृद्धी महामार्गासाठीचे भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. हा देशातील महत्त्वाचा रस्ता प्रकल्प आहे. हा महामार्ग महाराष्ट्र राज्याला २० वर्ष पुढे घेऊन जाणारा आहे. त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था बळकट होऊन अनेक उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे. महामार्गावरील कृषी समृद्धी केंद्रामुळे शेतीचा आणि परिसराचा विकास होऊन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे.

हा महामार्ग जेएनपीटीला जोडला जाणार असल्याने आंतरराष्ट्रीय आयात-निर्यातीला गतिमानता येऊन व्यापार-उद्योग वाढीस लागतील. हा महामार्ग खऱ्या अर्थाने राज्याला समृद्धीच्या दिशेने घेऊन जाणारा, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांना समृद्ध करुन राज्याचे आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडवणारा महामार्ग असणार आहे. असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहे.