05 June 11:06

सदाभाऊंचे कृषी अधिकाऱ्यांना ‘सेल्फी विथ फार्मर’चे आदेश


सदाभाऊंचे कृषी अधिकाऱ्यांना ‘सेल्फी विथ फार्मर’चे आदेश

कृषिकिंग, पुणे: यंदाच्या खरीप पेरण्या सुरळीत पार पडण्यासाठी कृषी खात्यातील शिपाई, क्लार्कपासून ते सर्व अधिकाऱ्यांना थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाण्यास भाग पाडणार आहे. त्याअनुषंगाने कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना ‘सेल्फी विथ फार्मर’चे आदेश देण्यात आले असून, खरीपाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन सेल्फी घ्यावी, असा आदेश सदाभाऊ खोत यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

अधिकारी शेतात बांधावर गेलेत याचा पुरावा म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसोबत सेल्फी काढून पाठवावा, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले आहे. अगदी कृषी विभागातील आयुक्तांपासून ते गाव पातळीवरील कृषी सहाय्यकांपर्यंत सगळ्यांनी सेल्फी काढून पाठवायचा आहे. कृषी अधिकारी खरेच शेतात गेले की नाही हे तपासण्यासाठी त्यांना शेतावरून सेल्फी पाठवण्याच्या सूचना सदाशिव खाेत यांनी बैठकीत दिल्या अाहेत.

बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या खरीप हंगामात कापूस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झाले होते. बीटी कापसाचे बियाणे विकणाऱ्या कंपन्यांची भूमिका त्यामध्ये संशयास्पद राहिली होती. याच पार्श्वभूमीवर या वर्षी कृषी खाते प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर जाणार आहे. याबाबत राज्यमंत्री सदाशिव खोत म्हणाले, ‘कोणत्या कंपनीचे बियाणे, खते, कीटकनाशके शेतकऱ्यांनी वापरली याची नोंद कृषी खात्याचे कर्मचारी-अधिकारी शेतावर जाऊन करतील. एखाद्या संकटात सापडल्यानंतरच हा तपशील यापूर्वी गोळा केला जायचा. या वेळी पेरणीपासूनच ही काळजी घेतली जाईल.’ असेही खोत यांनी यावेळी सांगितले आहे.