01 June 16:29

संपाने सरकारचे धाबे दणाणले, शांततेच्या मार्गाने आंदोलन करा : सदाभाऊ खोत


संपाने सरकारचे धाबे दणाणले, शांततेच्या मार्गाने आंदोलन करा : सदाभाऊ खोत

कृषिकिंग, मुंबई: शेतकरी संपाबाबत सरकारचे 'थांबा आणि पहा' धोरण सरकारच्या अंगलट येताना दिसते आहे. संपाच्या पहिल्याच दिवशी आक्रमक झालेल्या शेतकऱ्याने भाजीपाल्याच्या गाड्या अडवून भाजीपाला रस्त्यावर फेकला, दुधाचे टँकर फोडले. एकंदरीतच शहरात दुध आणि भाजीपाला जाऊ द्यायचा नाही यावर एकमत झालेला शेतकरी पहिल्याच दिवशी आक्रमक झाला. याची सुरवात मध्यरात्रीच झाली.

संपाचा एकंदरीत नूर पाहता सरकारचे धाबे दणाणले असून शेतकऱ्यांची मनधरणी करण्यासाठी पणनराज्यमंत्री सदाभाऊ खोतांना पुढे करण्यात आले. आज सदाभाउंनी शेतकऱ्यांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी विनवणी केली असून सरकार चर्चेस तयार असल्याबाबत सांगितले आहे.

शेतकरी राज्यभरातून एकवटत असून संप मागे घेण्याबाबत अजून कोणतेही अधिकृत निवेदन पुढे आले नाही. शेतकरी हा संप नेटाने चालविण्यासाठी एकवटला असून राज्यभर संपाच्या प्रतिक्रिया तीव्र होऊ लागल्या आहेत. दरम्यान शेतकऱ्यांच्या संपाबाबत अस्वस्थ झालो आहे अशी प्रतिक्रिया मा. कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली आहे. राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेष यात्रेने देखील राज्यभर वातावरण तापविले आहे.

एकंदरीत शेतकऱ्याचा हा संप महाराष्ट्रातील राजकारण ढवळून काढणार हे नक्की झाले आहे.