24 January 10:43

शेतीसाठी आणणार नवे तंत्रज्ञान- मुख्यमंत्री


शेतीसाठी आणणार नवे तंत्रज्ञान- मुख्यमंत्री

कृषिकिंग, मुंबई: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी स्थापन केलेल्या केंद्राचा मुंबईत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात असून, राज्यातील शेतकऱ्यांसाठी व्हॅल्यूचेन, शेतीसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर, नवीन संशोधनांचा उपयोग आणि सकस अन्नाची गरज अशा अनेक विषयांवर या वेळी व्यापक चर्चा झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम-२०१८ साठी मुख्यमंत्री सध्या डाओसमध्ये आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अन्नसुरक्षाविषयक विभागाचे प्रमुख सीन डी क्लीन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी याबाबत चर्चा केली.

विविध तज्ज्ञांचा सहभाग असलेल्या फोरमच्या मुंबईतील केंद्रातून ज्ञानाचे आदानप्रदान करण्याबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाधारित धोरणांची अंमलबजावणी करणे अधिक सुकर होईल. या केंद्राच्या माध्यमातून रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, शेतीसाठी ड्रोनसारख्या तंत्राच्या वापरावर भर देण्यात येणार आहे. क्लीन यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार सार्वजनिक-खासगी भागीदारीतून व्हॅल्यूचेनला अधिक चालना देऊन राज्यातील २५ लाख शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. तसेच शेती क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर, बँकांसोबत व्यापक भागीदारी, प्रत्यक्ष पीकपद्धतीवर आधारित अर्थपुरवठा आणि सुयोग्य विम्याच्या सुविधा या विषयांवरही चर्चा झाली. ही चर्चा अन्नसुरक्षा, शाश्वत पर्यावरण आणि आर्थिक संधीतून शाश्वत शेतीकडे अधिक चांगली वाटचाल करण्यासाठी निश्चितपणे उपयोगी ठरेल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत.