18 June 10:22

शेती व ग्रामीण हाट सुधारणांसाठी निधी द्या- मुख्यमंत्री


शेती व ग्रामीण हाट सुधारणांसाठी निधी द्या- मुख्यमंत्री

कृषिकिंग, नवी दिल्ली: शेतकऱ्यांच्या भागातील शेतमालाला योग्य भाव मिळावा व ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या राज्यातील ३ हजार ५०० ‘ग्रामीण हाट’चे नुतनीकरण व सुधारणांसाठी ॲग्रो मार्केट इन्फ्रा फंड मधून निधी उपलब्ध व्हावा. तसेच दूध भुकटीच्या निर्यातीवर १० टक्के प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीती आयोगाच्या बैठकीत केली आहे.

राष्ट्रपती भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या कार्यकारी परिषदेच्या चौथ्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल, नीती आयोग तसेच केंद्र व राज्य शासनांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासासाठी ‘विशेष कृषी ग्राम योजनेंतर्गत’ स्किम्ड दूध पावडर निर्यातीवर १० टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे. तसेच आवश्यक वस्तु अधिनियमांतर्गत दूध भुकटीसाठी एमएसपी निश्चित करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. याशिवाय साखर कारखान्यांना सॉफ्ट लोनची फेररचना करून देण्यात यावी, तसेच कर्ज परतफेडीचा कालावधी आणखी दोन वर्षांनी वाढवून देण्यात यावा. साखरेचे किमान मूल्य निश्चित करण्यात यावे. ऊसापासून केवळ साखरे ऐवजी बेहेवी मोलॅसिसपासून इथेनॉलनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी, केंद्र शासनाने पुढाकार घ्यावा. यामुळे इथेनॉलपासून इंधन तयार करण्याच्या प्रक्रियेला गती येईल, अशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केल्या आहेत.