09 June 13:38

शेतक-यांच्या हातात कांद्याला किलोमागे ३८ पैसे


शेतक-यांच्या हातात कांद्याला किलोमागे ३८ पैसे

कृषिकिंग, संगमनेर(अहमदनगर): संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील एका शेतक-यावर कांद्याचा भाव पाहून हतबल होण्याची वेळ आली आहे. बाजार समितीत विक्री झाल्यानंतर सर्व खर्च जाऊन शेतक-याच्या हातात किलोमागे अवघे ३८ पैसे हातात पडले. त्यामुळे शेतक-यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले आहे.

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे ( भागवतवाडी ) येथील जयराम सोपान भागवत यांनी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण २४ गोण्या कांदा विक्रीस आणला. आठ गोण्या कांद्याचे १२५ रुपये क्विंटल, तर सोळा गोण्या कांद्याचे दुसरे ७५ रुपये क्विंटल असा भाव मिळाला. या भावाप्रमाणे विकलेल्या १४ क्विंटल २२ किलो कांद्याचे एकूण १ हजार ३०३ रुपये झाले. त्यामधून ७४ रुपये ५५ पैसे हमाली, ५४ रुपये ४५ पैसे तोलाई आणि २४ रुपये वारई असे १५३ कापण्यात आले. तसेच गोण्यांच्या बारदाण्याचे ६०० रुपये वजा करण्यात आले. असा सर्व खर्च ७५३ रुपये मिळालेल्या १ हजार ३०३ मधून वजा करण्यात आले. त्यामुळे भागवत यांच्या हातात ५५० रुपये देण्यात आले. एकूण १ हजार ४०० किलोचा हिशोब केल्यास प्रतिकिलोस फक्त ३८ पैसे भाव मिळाला. त्यामुळे शेतक-याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिले नाही.टॅग्स