16 October 17:14

शेतकऱ्यांसाठी १ लाख सौर कृषीपंपाच्या योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी


शेतकऱ्यांसाठी १ लाख सौर कृषीपंपाच्या योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी

कृषिकिंग, मुंबई: "मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी १ लाख सौर कृषीपंपाची योजना ३ वर्षात राबविण्यात येणार आहे. यामुळे १ लाख शेतकऱ्यांना दिवसा पिकांना पाणी देणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांचे दिवसा वीज पुरवण्याचे स्वप्न या योजनेमुळे साकारले होणार असून, या योजनेसाठी शासन ३ वर्षात ८५८.७५ कोटी रुपये खर्च करणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यास मंजुरी देण्यात आली आहे." अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

ही योजना सन २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१ अशी तीन वर्षात राबविली जाणार आहे. पहिल्या वर्षी २५ हजार, दुसऱ्या वर्षी ५० हजार व तिसऱ्या वर्षी २५ हजार या प्रमाणे पुढील तीन वर्षात शेतकऱ्यांना १ लाख कृषी पंपाचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत ५ एकरापर्यंत शेत असलेल्या शेतकऱ्यांना ३ हॉर्स पॉवर तर त्याहून जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना ५ हॉर्स पॉवरचा सौरपंप दिला जाणार आहे. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे, असेच शेतकरी पात्र असणार आहेत. तसेच अशा शेतकऱ्यांकडे पांरपरिक पध्दतीने वीज जोडणी झालेली नसणे आवश्यक असणार आहे.

कृषीपंप ग्राहकांना वीज पुरवठा करताना लघुदाब वाहिनीची लांबी वाढते आहे. परिणामी कमी दाबाने वीज पुरवठा, वीज पुरवठा खंडीत होणे, वारंवार बिघाड होणे. अशा घटना समोर येतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना नवीन वीज जोडणी देण्याकरिता उच्चदाब वितरण प्रणालीलाही (एचव्हीडीएस) यावेळी मान्यता देण्यात आली आहे.