15 February 15:45

शेतकऱ्यांनो...! भाजपच्या मंत्र्यांना झोडपून काढा- राजू शेट्टी


शेतकऱ्यांनो...! भाजपच्या मंत्र्यांना झोडपून काढा- राजू शेट्टी

कृषिकिंग, उस्मानाबाद: “गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारची तूटपुंजी मदत घेण्यापेक्षा भाजपच्या मंत्र्यांना झोडपून काढा, त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही,” असे विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. मंत्र्यांना झोडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढाकार घेईल, शेतकऱ्यांनीही सोबत यावे, असे आवाहनही शेट्टी यांनी केले आहे.

सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणतात भाजप सरकारने २३ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. मात्र प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना एक दमडीही मिळालेली नसून, सरकार सातत्याने फसव्या घोषणा करत आहे. गावागावातील बँका कर्जमाफी घोषणेनंतरच्या सहा महिन्यांचे व्याज आकारणीसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. असा आरोपही शेट्टी यांनी केला आहे.

पामतेल आयात केल्यामुळे सोयाबीनचे दर पडले, मोठ्या प्रमाणात डाळी आयात केल्या, त्यामुळे तुरीचे दर पडले, हा सरकारच्या चुकीच्या आयात धोरणाचा परिणाम आहे. पाकिस्तानमधून चोरट्या मार्गाने साखर आयात केल्याने भारतातल्या साखरेचे दर पडले, त्यामुळे साखर कारखाने ऊस उत्पादकांना एफआरपी देऊ शकत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जात बूडतोय, यामागे शेतकऱ्यांचा दोष नाही. त्यामुळे आम्ही कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती करण्यासाठी सातबारा कोरा करण्याची मागणी करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.