21 December 11:03

शेतकऱ्यांना ‘अटी, शर्ती’ आणि ‘ऑनलाइन’ प्रक्रियेच्या नावाखाली रडवले; उद्धव ठाकरेंचा निशाणा


शेतकऱ्यांना ‘अटी, शर्ती’ आणि ‘ऑनलाइन’ प्रक्रियेच्या नावाखाली रडवले; उद्धव ठाकरेंचा निशाणा

कृषिकिंग, मुंबई: कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल २०० रुपये याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारला यावरून चांगलंच धारेवर धरलं आहे. शेतकऱ्यांप्रश्नी उशिरानं जाग आल्याची टीका करत उद्धव यांनी सामनाच्या संपादकीयमधून टीकास्त्र सोडले आहे.

''सत्ताधाऱ्यांनी कांद्याला प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला हे चांगलेच आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी रखडणार नाही याची काळजी घ्या. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या वल्गना जे सरकार उठताबसता करीत असते तेच सरकार लोकसभेमध्ये ‘तशी सरकारची कोणतीही योजना नाही’ असे स्पष्ट करते. कांदा अनुदानाबाबत उद्या शेतकऱ्याला असे काही सरकारी उत्तर ऐकायला मिळू नये, इतकेच'', अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला आहे.

मध्य प्रदेश, राजस्थानात नवनियुक्त काँग्रेस सरकारने सत्ताग्रहण केल्यानंतर दोन दिवसांत दोन लाखांपर्यंत शेतकरी कर्जमाफी जाहीर केली गेली. महाराष्ट्रात मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले. ऐतिहासिक ‘शेतकरी संप’ पुकारावा लागला. अखेर राज्यकर्त्यांनी दीड लाखाची शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. मात्र त्याचा आनंदही शेतकऱ्याला सहजासहजी घेता आला नाही. कर्जमाफीसाठीही शेतकऱ्यांना ‘अटी व शर्ती’ आणि ‘ऑनलाइन’ प्रक्रियेच्या नावाखाली रडवले गेले. एवढे करूनही नेमका किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला याचा तपशील आजही गुलदस्त्यातच आहे.