23 July 12:48

शेतकऱ्यांना फसविणारा श्रीलंकेतील संशयित जेरबंद


शेतकऱ्यांना फसविणारा श्रीलंकेतील संशयित जेरबंद

कृषिकिंग, नाशिक: नाशिकमधील शेतकऱ्यांकडून कांदा, इतर कृषिमाल, ज्युट पोती खरेदी करून त्याचा सुमारे ७५ लाखांचा मोबदला देण्यास टाळाटाळ करून फसवणूक करणाऱ्या श्रीलंकेतील संशयिताला तामिळनाडूतील मदुराई विमानतळावर पकडण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. संशयितांनी साईपादुका एक्स्पोर्ट नावाने कंपनी स्थापन करून शेतकऱ्यांची फसवणूक केली होती.

यासंदर्भात ऑगस्ट २०१७ मध्ये विजयकुमार चंद्रशेखर (सेलम, तामिळनाडू), ससिगरण नागराज (कोलंबो, श्रीलंका) यांच्या विरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या शाखेचे तत्कालीन साहाय्यक निरीक्षक राजेश गवळी यांनी नोटीस पाठवत संशयित नागराजची माहिती सर्व विमानतळांवर दिली होती. तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त भगवान सोनवणे आणि तपास अधिकारी उपनिरीक्षक शिवाजी काकड हे तामिळनाडू पोलिसांच्या संपर्कात होते. उपरोक्त प्रकरणातील संशयित नागराज हा तामिळनाडूत आल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक पोलिसांच्या मदतीने १४ जुलै रोजी मदुराई जिल्ह्य़ातील पेरीगुडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अटक करण्यात आली. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. न्यायालयाने नागराजची २० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणातील पहिला संशयित विजयकुमार चंद्रशेखरने तक्रारदाराला काही रक्कम परत करत पुढील रक्कम देण्याचे न्यायालयात मान्य केले आहे. आतापर्यंत संशयितांनी तक्रारदार व्यापाऱ्याला पावणेतेरा लाख रुपये परत केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

दरम्यान, संशयित आणि त्याच्या साथीदारांनी नाशिक, नगर जिल्ह्य़ातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कांदे, ज्युट, कृषिमाल खरेदी करून त्या मालाचा मोबदला दिलेला नाही. ज्या शेतकरी किंवा व्यापाऱ्यांची संशयितांकडून फसवणूक झाली असेल त्यांनी तात्काळ आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.टॅग्स