29 March 08:30

शेतकऱ्यांना दिलं जाणारं अनुदान घटवण्यासाठी पश्चिमी देशांकडून भारतावर दबाव


शेतकऱ्यांना दिलं जाणारं अनुदान घटवण्यासाठी पश्चिमी देशांकडून भारतावर दबाव

कृषिकिंग, नवी दिल्ली: अमेरिका व पश्चिम युरोपीय देशांनी भारतावर शेतकऱ्यांना प्रमाणापेक्षा अधिक अनुदान देण्याचा आरोप लावलाय. या देशांचे म्हणणं आहे की, भारत जगातिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) नियमांचं उल्लंघन करत आहे. भारताने आपल्या शेतकऱ्यांना भरघोस अनुदान दिल्यामुळे जागतिक बाजारपेठेत कृषी उत्पादनांच्या दरात घसरण होते. जेव्हा भारतीय कृषी उत्पादने दुसऱ्या देशांमध्ये निर्यात होऊन पोहचतात. तेव्हा त्या देशातील शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावे लागते. कारण त्या देशातील देशांतर्गत बाजारात स्थानिक कृषी उत्पादनांच्या दरात मोठी घसरण होते.

अमेरिकेने आरोप केलाय की, भारत आपल्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या ६० ते ७० टक्के अनुदान देतो. डब्ल्यूटीओच्या नियमांनुसार, १० टक्क्यांपेक्षा अधिकचे अनुदान दिले जाऊ शकत नाही. यावर भारताने आपण १० टक्क्यांपेक्षा कमी अनुदान देत असल्याचे सांगितले आहे.

तसेच या देशांनी केलेले सर्व दावे भारताने फेटाळून लावले आहेत. केंद्रीय वाणिज्य सचिव अनूप वधावन यांनी सांगितले आहे की, भारतात शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान हे पश्चिमी देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे.

सध्यस्थितीत;
- भारतात प्रति शेतकरी वार्षिक १५ हजार ६७४ रुपये अनुदान मिळते.
- ब्राझीलमध्ये प्रति शेतकरी वार्षिक २५ हजार ९०० रुपये अनुदान मिळते.
- चीनमध्ये प्रति शेतकरी वार्षिक ५९ हजार ६०५ रुपये अनुदान मिळते.
- युरोपियन युनियनमध्ये प्रति शेतकरी वार्षिक ६ लाख ६७ हजार रुपये अनुदान मिळते.
- जपानमध्ये प्रति शेतकरी वार्षिक ७ लाख रुपये अनुदान मिळते.
- कॅनडामध्ये प्रति शेतकरी वार्षिक ११ लाख ४४ हजार रुपये अनुदान मिळते.
- अमेरिकेमध्ये प्रति शेतकरी वार्षिक ४१ लाख ८८ हजार रुपये अनुदान मिळते.टॅग्स