14 September 10:03

शेतकऱ्यांना कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या डी.पी.सेल्सच्या निर्यातदारांना अटक


शेतकऱ्यांना कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या डी.पी.सेल्सच्या निर्यातदारांना अटक

कृषिकिंग, नाशिक: नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांच्या कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात फरार असलेल्या डी.पी.सेल्स कार्पोरेशनच्या दीपक आणि प्रशांत राजेभोसले या बंधू संशयित निर्यातदारांना निपाणी येथे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नाशिक जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.

शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणातील पहिला संशयित डी. पी. सेल्सचे संचालक ज्ञानदेव राजेभोसले याला तीन महिन्यांपूर्वी पोलिसांनी अटक केली. ज्ञानदेव यांचे दोन पुत्र फरार झाले होते. पोलिस त्यांच्या मागावर होते. दरम्यान, ज्ञानदेव राजेभोसले आणि त्यांचे दीपक व प्रशांत हे पुत्र भागीदार असलेल्या डी. पी. सेल्स या द्राक्ष निर्यातीदार कंपनीतर्फे गेल्या दहा वर्षात अनेक शेतकऱ्यांकडून निर्यातक्षम द्राक्षांची खरेदी करण्यात आली. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांना त्यांनी पैसे दिले नाहीत. शेतकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करुनही त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. पैसे मागणाऱ्यांना धमकावण्यात आल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. याबाबत पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात गेल्या वर्षी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

डी. पी. सेल्सच्या संचालकांनी थेट बागेत येऊन माल खरेदी केला. सर्व माल नेल्यानंतर पैसे दिले नाहीत. पुढच्या वर्षी पैसे देतो असे आश्‍वासन दिले. मागील वर्षीचे पैसे निघतील या आशेने पुन्हा शेतकऱ्यांनी त्यांना माल दिला. मात्र शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. या स्थितीत अनेक शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली. त्यामुळे व्यवहारात संपूर्ण सावधगिरी बाळगावी, अशी जनजागृती जिल्ह्यातील द्राक्षाच्या पट्यात ग्रामसभांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.टॅग्स