12 May 10:07

शेतकऱ्यांच्या भरवशावर राज्याचा डोलारा; त्यांच्या हिताच्या निर्णयांनाच प्राधान्य- मुख्यमंत्री


शेतकऱ्यांच्या भरवशावर राज्याचा डोलारा; त्यांच्या हिताच्या निर्णयांनाच प्राधान्य- मुख्यमंत्री

कृषिकिंग, मुंबई: ज्यांच्या भरवशावर राज्याचा डोलारा उभा आहे, त्या शेतकरी बांधवांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ नये. अशीच शासनाची भूमिका आहे. त्यातूनच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजगुरुनगर-खेड मधील निमगाव, कणेरसर, दावडी, केंदूर या चार गावांशी निगडीत विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच या जमिनींवरील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना हस्तांतरण करण्यासाठीचे शुल्कही माफ केले. त्यांच्या असलेल्या या शेतकऱ्यांप्रती संवेदनशील भूमिकेबद्दल संबंधित चार गावातील शेतकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खा.राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेत सत्कार केला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, शासनाने नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास प्राधान्य दिले आहे. जमिनी अधिग्रहित करताना अधिकाधिक मोबदला दिला पाहिजे. रखडलेले पुनर्वसन नीट व्हावे याबाबत प्रयत्न केले आहेत. ज्यांच्या भरवश्यावर राज्याचा डोलारा उभा आहे, त्यांच्यावर अन्याय होऊ नये अशीच शासनाची भूमिका आहे.

“सेझ रद्द व जमीन हस्तांतरण शुल्क माफ करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वसामान्यांना न्याय देणारी रास्त भुमिका घेतली आहे. शासनाने यात सकारात्मक असा चांगला निर्णय घेतला आहे.” असे खासदार राजू शेट्टी यावेळी म्हणाले आहे.