26 February 10:04

शेतकरी कर्जमाफीसाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्यास संधी- मुख्यमंत्री


शेतकरी कर्जमाफीसाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्यास संधी- मुख्यमंत्री

कृषिकिंग, मुंबई: "छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव कर्जमाफीसाठी अर्ज करता आले नाहीत. अशा शेतकऱ्यांसाठी १ मार्च ते ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्यास संधी देण्यात आली आहे." असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत ५४ लाख ७२ हजार ३११ अर्ज निकाली काढले असून, त्यापैकी ४६ लाख ३५ हजार ६४८ खात्यांमध्ये पैसे जमा करण्यासाठी बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत. यापैकी ३० लाख कर्जमाफीची खाती व १६ लाख खाती प्रोत्साहन योजनेतील आहेत. आतापर्यंत १३ हजार कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. एकूण ६७ लाख अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील १३ लाख अर्ज तालुका स्तरिय समितीकडे पडताळणीसाठी पाठविले असल्याचे त्यांनी सांगितले. एक रकमी परतफेड योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाची उर्वरित रक्कम भरून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन बँकांच्या माध्यमातून केले जात आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

कर्जमाफी योजना अत्यंत पारदर्शी पद्धतीने राबविण्यात येत आहे. समितीने संपूर्ण डेटा संकलित केला आहे. ओव्हरड्यूव्ह असलेली सुमारे एक लाख खाती क्लिअर करण्यात येत आहेत. अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.