23 June 14:35

शेतकरी कर्जमाफी व हमीभावासंदर्भात शरद पवारांची भेट


शेतकरी कर्जमाफी व हमीभावासंदर्भात शरद पवारांची भेट

कृषिकिंग, नवी दिल्ली: माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या ६ जनपथ निवासस्थानी शेतकरी कर्जमाफी व हमीभावासंदर्भातील कृषिविषयक विविध प्रश्नांबाबत एक बैठक आज सकाळी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित होते.

विशेष म्हणजे बैठक संपल्यानंतरही पाऊण तास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. या बैठकीत शेतकरी कर्जमाफी व हमीभावासंदर्भात नेमक्या कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, शेतकरी आंदोलनावरून भाजप सरकार अडचणीत आले असताना शरद पवारांचं मन वळवून कर्जमाफीचा मुद्दा तडीस लावण्यावर भाजप भर देत असल्याचे समोर येत आहे.

दरम्यान या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती देताना सांगितले आहे की, राजकीय नेत्यांसोबत मॅरेथॉन बैठका घेऊन कर्जमाफीवर तोडगा काढण्यात येत आहे. या संदर्भात आज रात्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याचंही चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले आहे. तसेच शरद पवार यांनी काही सूचना केल्या आहेत. त्याचाही विचार करण्यात येणार आहे. याशिवाय कर्जमाफीसाठी एकूण ३८ हजार कोटी रुपये खर्च होणार असून, १ लाखांपर्यंतची सर्व कर्ज माफ होतील, असंही त्यांनी सांगितले आहे.