21 June 12:00

शेतकरी आंदोलनामुळे शेतमालाचे दर वाढले


शेतकरी आंदोलनामुळे शेतमालाचे दर वाढले

कृषिकिंग,मुंबई: केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर म्हणजेच २०१४ नंतर देशात तांदूळ, कापूस आणि अन्य शेतमालाच्या किमान खरेदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसत आहे. देशातील प्रमुख राज्यांत शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर शेतमालाला दर वाढून मिळाले आहेत.

सामान्य प्रकारच्या तांदळाच्या दरात ५.४ टक्के वाढ झाली असून, प्रति क्विंटलसाठी हे दर १,५५० रुपये आहेत. कापसाच्या दरातही दीर्घकाळानंतर वाढ होऊन हे दर १ जुलैपासून प्रति क्विंटलसाठी ४,३२० रुपये करण्यात आले आहेत. तांदूळ, कापूस आणि अन्य शेतमालाचे दर वाढवावेत, यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकरी आक्रमक झाले होते. यासोबतच शेतकऱ्यांनी कर्जमाफीचीही मागणी केली होती.

कांदा, टोमॅटो आणि बटाटे यांच्या दरात घसरण झाल्यामुळे आणि सरकार या शेतमालाला रास्त दर देऊ न शकल्याने उत्पादक आंदोलन करीत आहेत. सरकारने १ जुलैपासून सोयाबीनच्या दरात ९.९ टक्के वाढ केली आहे. प्रति क्विंटलसाठी हे दर आता ३,०५० रुपये आहेत.

मक्याच्या दरात ७.१ टक्के वाढ होऊन, हे दर प्रति क्विंटलसाठी १,४२५ रुपये केले आहेत. १ जुलै २०१२ नंतरचे या पिकांचे हे सर्वात जास्तीचे दर आहेत.