20 June 16:38

शेट्टी-सदाभाऊ यांच्यातला संघर्ष पोहोचला खालच्या पातळीवर


शेट्टी-सदाभाऊ यांच्यातला संघर्ष पोहोचला खालच्या पातळीवर

कृषिकिंग, कोल्हापूर: कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यातला संघर्ष अत्यंत खालच्या पातळीवर गेल्याचे मंगळवारी उघड झाले. सदाभाऊ यांच्या वडिलांच्या आजारपणासाठी आपण अडीच लाख रुपये खर्च केल्याचा उल्लेख खासदार शेट्टी यांच्याकडून सोशल मिडीयावर आल्यावर तातडीने हे अडीच लाख रुपये ‘आरटीजीएस’ने त्यांच्या खात्यावर पाठवून दिल्याचे खोत यांनी जाहीर केले आहे. ‘माझ्या बापाला तुमच्या ऋणातून मुक्त केल्याचे’ सदाभाऊ यांनी उद्वेगाने म्हटले आहे. त्यासंबंधीची माहितीही त्यांनी सोशल मीडियावरील संदेशातून दिली आहे.

सदाभाऊ यांच्या आईच्या म्हणण्यानुसार आपले पती आजारी असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिलावती हॉस्पिटलमधील संपूर्ण खर्चाची व्यवस्था केली. त्यास खासदार शेट्टी यांच्या समर्थकांनी तीव्र आक्षेप घेतला व लगेच सोशल मिडीयावर सदाभाऊ खोत यांचा खोटारडेपणा उघड म्हणून एक पोस्ट फिरू लागली. त्यात असे म्हटले होते की, सदाभाऊ यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलचे २ लाख ५० हजार रुपये बिल हे राजू शेट्टी यांनी स्वत:च्या पगारातून भरले आहेत. त्यावेळी दूग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर यांनीही १ लाख ५० हजार रुपये दिले आहेत. आता प्रश्र्न असा आहे की जर मुख्यमंत्र्यांनी पैसे भरले असतील तर सदाभाऊ यांनी दवाखान्याच्या बिलासाठी शेट्टी यांनी दिलेल्या रक्कमेचा ढपला मारला आहे काय..? या पोस्टसोबत शेट्टी यांच्या समर्थकांकडून आयसीआयसीआय बँकेतून लिलावती हॉस्पिटलला ७ एप्रिल २०१५ ला आरटीजीएस द्वारे पैसे भरल्याची पावतीच पुरावा म्हणून जोडली आहे.

शेट्टी समर्थकांकडून सुरु असलेल्या या पोस्टला प्रत्युत्तर म्हणून सदाभाऊंनी काल सोमवारी १९ जूनला आयसीआयसी बँकेच्या जयसिंगपूर शाखेतील स्वाभिमानी अ‍ॅग्रो कंपनीच्या खात्यावर स्टेट बँकेच्या इस्लामपूर शाखेतून २ लाख ५० हजार रुपये भरले व त्या सोबत खासदार शेट्टी यांना एक दीर्घ पत्र व्हायरल केले.

त्यात ते असे म्हणतात,
‘प्रिय खासदार राजू शेट्टी,’ अशी सुरुवात करून लिहिलेल्या या पत्रात सदाभाऊ म्हणतात,‘मी माझे सगळे आयुष्य शेतक-यांना न्याय मिळावा, त्यांनी पिकवलेल्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी आंदोलन करण्यात घालवला. मी माझ्या नेत्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढलो. सन्माननीय शेट्टी यांच्यात थोडा जरी प्रामाणिकपणा शिल्लक असेल तर ते ही बाब मान्य करतील.

माझ्या वडिलांसाठी केलेल्या मदतीची जाहीर वाच्यता करून राजू शेट्टी यांनी सामाजिक संकेत पायदळी तुडविले असून आणि संघटनेचा नेता कसा नसावा याचे उदाहरण घालून दिले आहे. खरंतर यातून राजू शेट्टी यांच्याकडून मदत घेताना संघटनेचा कार्यकर्ता आता दहादा विचार करेल. त्यातून संघटना विस्कळीत होण्याचा धोका मला दिसतो आहे.

माझ्या वडिलांनी मला कर्जदाराच्या कर्जातून मुक्त होण्याचीच शिकवण दिली आहे. जी व्यक्ती केलेल्या मदतीची जाहीर वाच्यता करतो. त्याची मदत कधी घेऊ नको आणि घेतली तर ताबडतोब ती परत कर अशा व्यक्तीपासून दूर रहा अशीही शिकवण मला वडिलांनी दिली आहे. या शिकवणीला अनुसरून मी राजू शेट्टी यांनी दिलेले अडीच लाख रुपये परत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम मी त्यांच्या बँक खात्यात ‘आरटीजीएस’ने जमा करत आहे. मी आज आपल्या ऋणातून माझ्या बापाला मुक्त केले आहे.

ही रक्कम मी माझ्या पगारातून देऊ केली आहे त्यांच्याजवळील उतावीळ झालेले त्यांचे बगलबच्चे हे कोणत्या थराला संघटना घेऊन निघालेले आहेत. हे अंध झालेल्या नेत्याला कसे दिसणार..? परंतु या चळवळीमध्ये अनेक जिवाभावाची माणसे मिळाली व त्यांनी भरभरून प्रेम दिले. मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. राजू शेट्टींना नेता मानत असताना मला कधीही कमीपणा वाटला नाही. परंतु आपल्या बगलबच्यांच्या मदतीने माझी प्रतिमा मलिन करण्याचा अटोकाट प्रयत्न केला. त्याचे मला किंचितही दु:ख वाटले नाही.

शेतकरी चळवळीतील आंदोलने सुरू झाली की गावातल्या भोळ्या-भाबड्या लोकांना घेऊन स्वत: आंदोलनातसुद्धा माझा बाप उतरायचा. माझ्या बापाला मी चळवळीत काम करतोय याचा मोठा अभिमान होता. कधीही त्यांनी मला घराकडे मागे वळून पाहू दिले नाही. माझा बाप दवाखान्यात असतानासुद्धा त्यांनी मला शेवटपर्यंत साथ दिली. आत्महत्या करणा-या शेतक-यांसाठी त्यावेळी मृत्यूलाही सांगितले की, माझा पोरगा दिलासा यात्रा काढून परत येऊ दे. मग मी तुझ्याबरोबर येईन. शेतकऱ्यांसाठी मृत्यूलाही आव्हान देणारा माझा बाप मी राजू शेट्टींच्या बगलबच्यांच्या ऋणामध्ये कधीही ठेवणार नाही. इथून पुढे मी माझी लेखणी हीन पातळीच्या लोकांसाठी चालवणार नाही. पण मला दु:खाने आवर्जून म्हणावे लागते. जे काय बोलली असेल तर ती माझी आई होती. तिच्या अंत:करणातले ते बोल होते. असे अनेकदा राजू शेट्टींची आईही वेगवेगळ्या विषयावर बोलताना पाहिलेलं आहे, परंतु मला त्या आईच्या व माझ्या आईमध्ये फरक वाटला नाही. परंतु माझ्या आईबद्दल राजू शेट्टी व त्यांच्या बगलबच्च्यांना का वेगळे वाटले हे न उलगडणारे कोडे आहे.’ पत्राच्या शेवटी त्यांनी ‘शेतकºयांचा मित्र आणि संघटनेचा छोटा कार्यकर्ता सदाभाऊ खोत’ असे म्हटले आहे.

मनाचा कोतेपणा...
आंदोलनात आपल्या सहकाऱ्याला केलेल्या मदतीचा उल्लेख नेत्याने करायचा नसतो. नाही तर नेता आणि सामान्य कार्यकर्ता यांच्यात काय फरक राहील, डोक्यात हवा गेली की नेता बरळू लागतो. त्याचे नेतेपण विसरून मनाचा कोतेपणा दिसू लागतो.