08 February 10:24

विदर्भ-मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता


विदर्भ-मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता

कृषिकिंग, मुंबई: विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागांत येत्या १० ते १३ फेब्रुवारी दरम्यान गडगडाटासह वादळी वारे वाहून गारपीट होण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांनी या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या पिकांची कापणी करून शेतीमालाची योग्यरीत्या साठवणूक करावी. सर्व नागरिकांनी वादळ, विजा आणि गारपिटीपासून संरक्षण होण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात आले आहे.

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, नांदेड, लातूर जिल्ह्यांमध्ये, तसेच अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील पूर्व भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्‍यता आहे. पूर्व विदर्भामध्ये या दिवशी गारपीट होण्याची शक्‍यता अधिक आहे. ११ व १२ फेब्रुवारी रोजी या जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्‍यता असून, गारपीट होण्याच्या शक्‍यतेसह या वाऱ्यांची तीव्रता अधिक असेल. विदर्भ आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये या दोन्ही दिवशी अधूनमधून वादळी वारे वाहण्याची व ढगाळ वातावरण राहण्याची शक्‍यता आहे.

१३ फेब्रुवारी रोजी वादळ वाऱ्याची तीव्रता कमी होईल तर १४ फेब्रुवारीपासून हवामान सर्वसाधारण होण्याची शक्‍यता आहे. कापणीवर आलेल्या ज्वारीसारख्या पिकांची कापणी करून धान्य योग्यरीत्या साठवावे. शेतीमालाच्या व्यापाऱ्यांनी देखील शेतीमालाची संरक्षितपणे साठवणूक करावी. सर्व नागरिकांनी वादळी वारे, विजा आणि गारपिटीपासून स्वत:सह गुराढोरांचे संरक्षण होईल, याची दक्षता घ्यावी असे आवाहनही राज्य शासनाकडून करण्यात आले आहे.