12 March 10:27

विदर्भ-मराठवाड्यात वादळी पाऊस; १५ मार्चनंतर पुन्हा पावसाचा अंदाज


विदर्भ-मराठवाड्यात वादळी पाऊस; १५ मार्चनंतर पुन्हा पावसाचा अंदाज

कृषिकिंग, पुणे: सध्या राज्यात उन्हाची काहिली वाढली असून, काल (रविवारी) दुपारनंतर मराठवाडा, विदर्भातील सुमारे ९ ते १० जिल्ह्यांत ढगांचा गडगडाट, जोरदार वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने फळबागांसह रब्बी हंगामातील काढणीच्या अवस्थेतील पिकांचे नुकसान केले आहे.

काल दुपारनंतर अचानक ढग दाटून येत अंधारून आल्याने विदर्भात अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांत काही भागांत ढगांच्या गडगडासह पावसाने हजेरी लावली. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील उरळ, रिधोरा, व्याळा परीसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. मराठवाड्यात परभणी जिल्ह्यातील गुगळी धामणगाव (ता. सेलू), जालना जिल्ह्यातील पिंपळगाव रेणुकाई, औरंगाबादच्या चापानेर (ता. कन्नड), परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात पावसाने शिडकावा केला. तर शनिवारी रात्री तिकडे नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्याच्या परिसरात विजा, मेघगर्जनेसह जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला.

बंगालच्या उपसागरात सक्रिय असलेले कमी दाबाचे क्षेत्र, लक्षद्वीप बेटांपासून कोकण किनाऱ्यापर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा, उत्तर मध्य महाराष्टात समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती पोषक ठरल्याने राज्यात ढगाळ हवामान होत आहे. पुढील आठवडाभर हीच स्थिती कायम राहणार असून, गुरुवारपासून (१५ मार्च) विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकणात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.



टॅग्स