05 May 10:33

विकसनशील देशांना साखरेचा पुरवठा करावा- पवार


विकसनशील देशांना साखरेचा पुरवठा करावा- पवार

कृषिकिंग, मुंबई: “देशभरातील साखर कारखाने संकटाच्या परिस्थितीत आहे. साखर उत्पादक शेतकरी आणि उत्पादकांना वाचवण्यासाठी ‘सहकार’ क्षेत्राची स्थापना झाली. मात्र, सध्या सहकार क्षेत्रच अडचणीत आले आहे. यामुळे पुढील दोन वर्षे विकसनशील देशांना आर्थिक मदतीसोबत साखरेचा पुरवठा करावा,” अशी सूचना माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केंद्र सरकारला केली आहे. साखर दरातील घसरणीमुळे साखर कारखानदारांपुढे निर्माण झालेल्या अभूतपूर्व संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या कार्यालयात साखर कारखानदारांची बैठक पार पडली. यावेळी पवार बोलत होते.

राज्यासह संपूर्ण भारतात साखरेचे उत्पादन प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्याने साखर दरात घसरण होऊन उद्योग कमालीचा अडचणीत आला आहे. साखरेच्या भावात सतत चढ-उतार होत आहेत. काही आठवड्यांपूर्वी प्रतिक्विंटल ३,३०० रुपयांनी विकली जाणारी साखर आता २,७०० ते २,६०० रुपयांपर्यंत खाली घसरली आहे. यामुळे साखर कारखान्यांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. साखरेचा बाजार कोसळल्यामुळे कारखान्यांकडे एफआरपी देण्यासाठी पैसा राहिलेला नाही. चांगले पैसे मिळवून देणारे पीक असल्याने शेतकरी उसाकडे वळतो. त्यामुळे साखरेचे उत्पादन पुढेही वाढतच राहणार आहे. त्यासाठी सध्याच्या घडीला साखरेची निर्यात करणे हा एकमेव आणि अत्यावश्यक बाब आहे. असे पवार यांनी यावेळी सांगितले आहे.

भारत सरकार जगातील अनेक विकसनशील देशांना आर्थिक स्वरुपाची मदत करीत असते. अशा देशांना आर्थिक मदत करतानाच वस्तू स्वरुपात साखरेचा पुरवठा केल्यास देशांतर्गत साखरेची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. यापूर्वीच्या सरकारच्या काळात आम्ही असे प्रयोग केले आहेत. गहू, तांदळाचा आम्ही पुरवठा केला आहे. त्याच धर्तीवर केंद्र सरकारने यासंदर्भात तातडीने विचारविमर्श करुन निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यामुळे देशांतर्गत साखरेचे दर स्थिर होऊन शेतकऱ्यांसह उद्योगाला दिलासा मिळणार आहे. असेही पवार यावेळी म्हणाले आहे. दरम्यान, शिल्लक साखर आता तातडीने निर्यात करून पैसे न मिळाल्यास कारखान्यांना शेतकऱ्यांचे पैसे, एफआरपी देता येणार नाही. असेही त्यांनी नमूद केले आहे.



टॅग्स