21 February 15:43

विंचूर येथील फूड प्रोसेसिंग पार्कसाठी ९५० कोटी रुपयांची गुंतवणूक


विंचूर येथील फूड प्रोसेसिंग पार्कसाठी ९५० कोटी रुपयांची गुंतवणूक

कृषिकिंग, मुंबई: नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथील फूड प्रोसेसिंग पार्कसाठी ९५० कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित झाली आहे. हा प्रकल्प पुढील दोन वर्षात कार्यान्वित होणार असून, त्याद्वारे ५ हजार ४०० इतक्या नवीन लोकांना रोजगारनिर्मिती होणार आहे.

मुंबई येथे 'मॅग्नेटिक महाराष्ट्र', या जागतिक गुंतवणूकदारांच्या परिषदेत राज्य सरकारसोबत १५ अन्नप्रक्रिया उद्योगांनी सामंजस्य करार केले आहेत. त्यात विंचूर येथील फूड प्रोसेसिंग पार्कसाठीच्या ९५० कोटी रुपयांच्या कराराचा समावेश आहे. सन २००१ साली वाइन उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथे 'गोदावरी वाईन पार्क' विकसित केले होते. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आता विंचूर येथील फूड प्रोसेसिंग पार्कसाठी ९५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

विंचूर फूड प्रोसेसिंग पार्कसह ६५० कोटींचा जयंत ऍग्रो अँड फूड प्रोसेसिंग पार्क पुढील दोन वर्षांत उभारला जाणार आहे. त्याचप्रमाणे डेअरी पॉवर लि.नेही आपल्या नवीन प्लांटमध्ये ८६.६० कोटी रुपयांची गुंतवणूक करीत, ४५७ रोजगारांची निर्मिती केली आहे. तर पॉलीसेट्टी सोमासुंदरम ऍग्रो एक्सपोर्ट्सने ६० कोटी तर शिव साई एक्सपोर्ट्स युनिट्सची स्थापना करण्यासाठी १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याव्यतिरिक्त संगीता गौतम नील फूड, आर्य अॅग्रोटेक, आनंद सागर ऑइल मिल्स यांनी काही प्रमाणात गुंतवणूक केली आहे.