25 July 10:44

वाहतूकदारांच्या संपामुळे कोट्यवधी रुपयांचा कांदा सडण्याची भीती


वाहतूकदारांच्या संपामुळे कोट्यवधी रुपयांचा कांदा सडण्याची भीती

कृषिकिंग, लासलगाव(नाशिक): ट्रक चालकांचा संप चिघळल्याने ग्रामीण भागातील वाहतूकदार शेतीमालाची वाहतूक करायला तयार नाही. त्याचा परिणाम कांद्याच्या देशांतर्गत वाहतुकीवर झाला असून, लासलगाव कांदा बाजारपेठेमध्ये लिलावानंतर घेतलेला कांदा ठेवायचा कुठे, असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. राज्याबाहेर कांदा पाठवण्यासाठी ट्रक उपलब्ध नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कांद्याच्या लिलावात सहभागी न होण्याचा घेतला आहे. त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे. शेतकऱ्यांचा कांदा शेतात तसेच चाळीत पडून आहे. हा संप लवकर न मिटल्यास कोट्यवधी रुपयांच्या कांद्याचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संपामुळे नाशिक बाजार समितीत जवळपास चार लाख क्विंटल कांदा पडून आहे. त्यामुळे नाशिक बाजार समितीत कांद्याचे दर घसरु लागले आहेत.

तर तिकडे नवी मुंबई (वाशी) कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला आणि कांद्याची वाहतूक सुरळीत असली तरी बटाट्याच्या आवकीवर मात्र परिणाम झाला आहे. आवक कमी असल्याने बटाट्याचे भाव ३ ते ४ रुपयांनी वाढले आहेत. सध्या बटाटा १२ ते १३ रुपये प्रति किलोवरून १६ ते १७ रुपये प्रति किलोपर्यंत विकला जात आहे. ऑल इंडिया ट्रान्सस्पोर्ट असोसिएशनकडून बेमुदत संप पुकारण्यात आल्यामुळे उत्तरप्रदेशमधून येणाऱ्या बटाट्याच्या आवकीवर परिणाम झाला आहे.टॅग्स