03 March 10:46

वाढीव अबकारी कराने द्राक्ष निर्यात अडचणीत


वाढीव अबकारी कराने द्राक्ष निर्यात अडचणीत

कृषिकिंग, सांगली/नाशिक: द्राक्ष निर्यात करायची असेल तर प्रतिकिलो ७० रुपये वाढीव अबकारी कर भरावा लागणार असल्याने निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन अडचणीत आले आहे. गेल्या वर्षांपर्यंत केवळ १७ रुपयांवर असलेला हा कर या वर्षीपासून ५३ रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्षांना मिळणारा दर हा उत्पादकांना परवडणारा नाही.

नाशिक जिल्हा आणि सांगली-तासगावचा भाग हा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या दोन्ही जिल्ह्यात मोठ्या क्षेत्रावर द्राक्ष उत्पादन घेतले जाते. यातील मोठे क्षेत्र हे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाचे आहे. या द्राक्षनिर्मितीसाठी वेगळे प्रयोग राबविण्यात येत असल्याने खर्चही अधिक आहे. मात्र, परदेशी पाहुण्यांना द्राक्षाची वेगळी चव देण्याबरोबरच दोन पैसे जास्त मिळतात, यामुळे काही जिद्दी शेतकरी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतात.

यावर्षी अवकाळी पावसामुळे द्राक्षाच्या ३० टक्के बागा रोगाच्या तावडीत सापडल्याने मुळात उत्पादनात घट आली आहे. उर्वरित ७० टक्के बागांमधील ४० टक्के उत्पादन हे बेदाणानिर्मितीसाठी वापरले जाते, तर उर्वरित द्राक्ष उत्पादन हे बाजारपेठेसाठी उपलब्ध आहे. यापैकी सोनाका, सुपर सोनाका, माणिक चमन, कृष्णा आदी जातींची द्राक्षेही देशांतर्गत बाजारपेठेसाठी तयार केली जातात. तर थॉमसन, शरद सीडलेस, तास-ए-गणेश, धनाका या जातींची द्राक्षे निर्यात केली जातात.

देशांतर्गत बाजारासाठी प्रामुख्याने लांबट मणी असलेल्या द्राक्षांची गरज असते, मात्र परदेशी बाजारपेठेसाठी थोडी आंबट-गोड चवीची, हिरव्या रंगाची गोल मण्यांची असावी लागतात. या मण्याचे आकारमान १६ ते २० मिलिमीटर आणि एका घडाचे किमान वजन २५० ग्रॅम असणे आवश्यक असते. आणि औषधाची मात्रा निर्धारित प्रमाणात असणे बंधनकारक असते. देशी बाजारासाठी मण्यातील साखरेचे प्रमाण २२ ब्रिक्सपर्यंत असते, तर निर्यातीच्या द्राक्षातील साखरेचे प्रमाण १८ ते २० पर्यंत असते. दरम्यान या कराबाबत विधीमंडळामध्ये लक्षवेधी मांडण्यात आली आहे. त्यामुळे यावर आता राज्य शासन काय निर्णय घेते याकडे द्राक्ष उत्पादकांचे लक्ष लागले आहे.



टॅग्स