24 August 16:44

लासलगावात कांदा हब उभारणार- सदाभाऊ खोत


लासलगावात कांदा हब उभारणार- सदाभाऊ खोत

कृषिकिंग, लासलगाव (नाशिक): कांद्यावर कोणत्याही परिस्थितीत निर्बंध घालू देणार नाही. तसेच लासलगाव येथे कांदा हब निर्माण केले जाईल, अशी महत्त्वाची घोषणा कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्यावतीने विंचूर येथे कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार अनिल कदम तसेच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्यासह संचालकही यावेळी उपस्थित होते.

''कांदा साठवणूक चाळीच्या निधीत भरघोस वाढ केली आहे. तसेच ३५ लाख मेट्रिक टनाची होणारी आयात कमी करून ती २ लाख टनावर आणली आहे. मी शेतकरी चळवळीतील कार्यकर्ता आहे. त्यामुळेच सत्तेत शेतकर्‍यांचा समस्येवर आपण जागरूकतेने काम करत आहोत. लासलगाव येथे कांदा हब घोषित करीत असून त्याकरता या आठवड्यात एक बैठक होईल. मोठ्या प्रमाणावर गोदाम तसेच रेल्वे सुविधांवर भर दिला जाईल''. असेही खोत यांनी सांगितले आहे.

कांदा प्रश्नावर काहीही झाले तर मी कांदा उत्पादकांसाठी मी स्वतः येऊन नाशिक जिल्ह्यात आंदोलन करेन हा शब्द देतो. तसेच सर्व शेतकर्‍यांचा माझ्यावर विश्वास आहे, त्याला मी कदापि तडा जाऊ देणार नाही. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशियाख॔डाची कांदा बाजार समिती आहे तिला वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.टॅग्स