16 October 10:12

लासलगावात कांदा कडाडला; २ हजारांचा पल्ला गाठला


लासलगावात कांदा कडाडला; २ हजारांचा पल्ला गाठला

कृषिकिंग, लासलगाव(नाशिक): लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याने अचानक उचल खाल्ली असून, क्विंटलला तब्बल मागील सात महिन्याच्या कालावधीनंतर २ हजाराहून अधिक म्हणजे २१२१ रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. आवकेत झालेली मोठी घट व परराज्यात कांद्याचा हंगाम संपल्याने बाजारभावाने ही उसळी घेतली आहे.

कांद्याच्या दरात चार दिवसांपासून झळाळी आली असून, गेल्या आठवड्यात कांद्याने दीड हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता. त्यात आता पुन्हा तब्बल चारशे रुपयांची वाढ झाली आहे. लासलगाव बाजार समितीत सध्या ११ हजार ५९६ क्विंटल इतकी आवक होत असून, कांद्याला किमान ७०० रुपये, कमाल २१२१ रुपये तर सरासरी १८५१ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. पिंपळगाव बाजार समितीत किमान ८९० रुपये, कमाल २०४५ रुपये, तर सरासरी १६०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे.

मध्य प्रदेश, राज्यस्थानातील कांद्याचा हंगाम लवकर गुंडाळला गेला. त्यामुळे आता देशभरात कांद्याचा पुरवठा करण्याची भिस्त नाशिक जिल्ह्यावर आहे. त्यात नाशिकमध्येही शेतकऱ्यांच्या चाळीतील कांदा संपल्यात जमा आहे. अपुऱ्या पावसाने नवीन लाल कांद्याचे पीक अर्धाहून घटल्याने त्याचा परिणाम कांद्याच्या दरात वधारणा झाली आहे. कांदा व्यापारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी सांगितले आहे की, बांगलादेश, आसाम, दिल्ली, पंजाबमध्ये कांद्याला मोठी मागणी आहे. आवकेत घट होऊन मागणी वाढल्यास दर पुढील टप्पा गाठू शकतो.टॅग्स