24 April 12:59

लासलगाव बाजार समितीत नाफेडच्या कांदा खरेदीचा शुभारंभ


लासलगाव बाजार समितीत नाफेडच्या कांदा खरेदीचा शुभारंभ

कृषिकिंग, लासलगाव(नाशिक): मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकारने नाफेडमार्फत २५ हजार टन कांदा खरेदीची घोषणा केली होती. त्या घोषणेच्या अनुषंगाने अखेर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत या कांदा खरेदीचा शुभारंभ नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. बाजार समितीत खरेदी केलेल्या पहिल्या कांदा ट्रॅक्टरचे पूजन नाफेड संकुलाच्या खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष शांताराम नागरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले.

नाफेडच्या या कांदा खरेदीमुळे बाजारभावात सुमारे २०० ते २५० रुपये वाढ दिसून आली. गेल्या आठवड्यात २० एप्रिल रोजी ६०० ते ६५० रुपये क्विंटलने विकला जाणारा कांदा नाफेडच्या आगमनाने ८०० रुपये क्विंटलवर पोहचला आहे. प्रारंभीचा ट्रॅक्टर शेतकरी महेश दामू घोरपडे (रा. पाटोदा) यांच्या मालकीचा कांदा ७७० रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी करण्यात आला. सध्या बाजार समितीत ८१० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत कांदा खरेदी केला जात आहे.

शेतमालाचे भाव पडल्यावर केंद्र सरकारच्या वतीने किंमत स्थिरीकरण कोशातून शेतमाल खरेदी करण्याची योजना राबवली जाते. त्याअंतर्गत गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र शासनाने २५ हजार टन कांदा खरेदीची घोषणा केली होती. त्यामुळे आता कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प भावामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना नाफेडच्या कांदा खरेदीने दिलासा मिळणार आहे. सध्या उन्हाळ कांद्याचा काढणी हंगाम सुरू आहे. कांद्याचे उत्पादन भरपूर असल्यामुळे जिल्ह्यातील पिंपळगाव, कळवण, आदी ठिकाणीही नाफेडच्या वतीने कांदा खरेदी करण्यात येणार आहे.टॅग्स